पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : ५

 आज अमेरिका सर्व दृष्टींनी अत्यंत संपन्न व म्हणूनच अत्यंत बलाढ्य असे राष्ट्र आहे. तेथील धनपति, उद्योगपति, कारखानदार, तेथील शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, ग्रंथकार, इतिहासकार, तेथील राजकारणी, मुत्सद्दी, सेनानी, प्रशासक, संघटक हे जगांत निस्तुळ असे आहेत. त्यांनी विद्या, शास्त्र, कला, धन, पराक्रम, त्याग, धैर्य यांच्या थोर परंपरा निर्माण करून स्वदेशाचे सामर्थ्यं इतकें वाढविलें आहे की, त्याला जगांत तुलना नाही. अशा या राष्ट्राला सोव्हिएट रशियासारख्या चाळीस वर्षांपूर्वी अत्यंत दरिद्री, अप्रगत असलेल्या, सुलतानी सत्तेखाली भरडलेल्या, अर्ध रानटी अशा देशाच्या आक्रमणाची चिंता वाटावी याचा अर्थ काय ? हाच अर्थ आपल्याला येथे पाहावयाचा आहे आणि त्याची मीमांसा करावयाची आहे. या मीमांसेला फार महत्त्व आहे. रशियाच्या दण्डसत्तेने केवळ अमेरिकेला किंवा पाश्चात्त्य राष्ट्रांना आव्हान दिले आहे असें नाही. तें आव्हान सर्व लोकसत्तांना आहे. आपण भारतांत लोकसत्ता प्रस्थापित केलेली आहे. ती यशस्वी व्हावी अशी आपली मनीषा आहे. तेव्हा त्या आव्हानाचा आपण विचार केलाच पाहिजे. त्या दृष्टीने या अभ्यासाला फार महत्त्व आहे. पण त्या आधी सोव्हिएट रशियाच्या या आव्हानाचें स्वरूप काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याच्यामागे कोणतें सामर्थ्य आहे याचा विचार करणें अवश्य आहे. म्हणून तें विवेचन प्रथम करूं.
 सोव्हिएट रशियांतील आजची सत्ता ही रानटी आहे, क्रूर आहे, मानवता, सौजन्य, सहृदयता, समता, बंधुता, व्यक्तिस्वातंत्र्य या सुसंस्कृत मूल्यांचा तिला स्पर्शहि झालेला नाही अशी टीका नित्य केली जाते. त्या टीकेला अर्थ आहे यांत शंका नाही. तरी पण हा रानटीपणा कोणत्या स्वरूपाचा आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. नाहीतर आपली फसगत होईल. ॲटिल्ला, अलेरिक, तयमूर, चंगीझ हे कत्तलखान इतिहासांत प्रसिद्ध आहेत. स्टॅलिन व माओ यांनी त्यांच्यासारख्याच नरहत्या केल्या आहेत. कदाचित् त्या हिंस्र सुलतानांपेक्षा दसपट हत्या यांनी केल्या असतील; पण या हत्या त्यांनी कोणत्या हेतूने केल्या आणि कोणत्या सामर्थ्याने केल्या हें पाहिलें पाहिजे. तयमूर, चंगीझ, यांच्याप्रमाणे स्टॅलिन, माओ यांचे सामर्थ्य आडदांड व रानटी असतें तर अमेरिकेने त्याचा निमिषार्धात धुरळा करून टाकला असता. नव्या विज्ञानाने संपन्न असलेल्या देशांचे लष्करी सामर्थ्य व त्यांची संहारशक्ति