पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

भावना आहे. एरव्ही आपण सामान्य माणसें शेजाऱ्यांचा, भाऊबंदांचा द्वेष करीत राहतो, त्याच्या बुडाशी हीन असा स्वार्थ असतो; पण आक्रमकांच्या द्वेषामागे राष्ट्रीय स्वार्थ असतो. त्यामुळे माणसांतलें हीण जळून जातें, त्याच्या मनाचें उन्नयन होतें व तो वाटेल त्या पराक्रमाच्या कोटी करावयास सिद्ध होतो. भारतांतल्या हजारो क्रान्तिकारकांनी मातृभूमीवरील प्रेमाचें दुसरें अंग जें इंग्रजांचा द्वेष त्या द्वेषामुळेच अंदमान साहिलें, वधस्तंभ सोसला. महात्माजींच्या सत्याग्रहाच्या चळवळींत जे सामील झाले तेहि इंग्रजांच्या द्वेषानेच प्रेरित झाले होते. इंग्रजांवर प्रेम त्यांपैकी कोणीच करीत नव्हता, आणि मातृभूमीचें प्रेम व इंग्रजांचा द्वेष यामुळेच भारताच्या भिन्न प्रांतांत ऐक्य टिकून होतें. समान शत्रु, समान आपत्ति हा ऐक्याला पोषक असा घटक आहे.
 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेने 'नॅशनॅलिझम' या नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. त्यांत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया इत्यादि देशांत राष्ट्रनिष्ठेचा उदय व परिपोष कसा झाला तें विवरून सांगितलें आहे. एक धर्म, भाषा, परंपरा इत्यादि कारणें देऊन दर ठिकाणीं अंतिम निर्णायक कारण म्हणून परक्यांचे आक्रमण हे दिलेले आहे. इंग्लंडमध्ये राष्ट्रभावना उदित झाली ती फ्रान्सबरोबर झालेल्या शतवार्षिक युद्धामुळे. नेपोलियनच्या आक्रमणामुळे जर्मनी संघटित झाला. त्याच्या आधी हे घडून येत नव्हते. रशियावर १८१२ साली नेपोलियनने स्वारी केली त्या वेळी त्याचा अहंकार दुखावला आणि अगोदर फ्रेंचमय होऊन गेलेले सरंजामदारहि फ्रेंचांच्या द्वेषाने पेटून गेले व मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे राहिले. (या ग्रंथाची पहिली पांच प्रकरणें पाहावी. ग्रंथ इंग्लंडमधल्या सहा सात पंडितांनी मिळून अनेक वर्षे संशोधन करून लिहिला आहे आणि युरोपातल्या वीस पंचवीस इतिहासवेत्त्यांनी तो तपासून पाहिला आहे.) जपानमध्ये १८५४ च्या आधी तीनशे वर्षे नुसता अंधार होता. अराजक होतें. दुही, फूट, मत्सर, परस्परांचा द्वेष, जातीय वैमनस्य यांनी, स्वातंत्र्योत्तर भारताप्रमाणे, तेथे नुसती बजबज माजली होती. इतकी की, अमेरिकन सेनापति कमोडोर पेरी याने नुसत्या तोफांच्या दहशतीने जपानला शरण आणले. पण या परकी आक्रमणामुळेच जपानी लोक खडबडून जागे झाले.