पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १४९

कायद्याने बंद करावं असा ठराव प्रकाशवीर शास्त्री यांनी लोकसभेत आपला होता; पण काँग्रेसने तो मान्य तर केला नाहीच, उलट तिचा मंत्रिमहाशयांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या सेवेचा गौरवच केला ! ही सेवा करतांनाच भारताच्या एका महाशक्तीवर हे परके मिशनरी केवढा घाव घालीत आहेत याची जाणीव काँग्रेसजनांना नाही काय ? सरहद्दीवरच्या जमातींच्या बाबतीत हेच घडत आहे. श्री. ह. वि. कामत यांनी नेपाळ, भूतान, कॅलिम्पांग या भागांत हिंडून माहिती जमा करून 'कम्युनिस्ट चायना कॉलनायझेस तिबेट, इन्व्हेड्स इंडिया' या नांवाची एक पुस्तिका लिहिली आहे, सरहद्दीच्या भागांतील लोकांची मनोवृत्ति काय आहे हे तीवरून स्पष्ट दिसून येईल. कॅलिम्पांग येथील एका दुकानदाराने श्री. कामत यांनी दिलेले एक भारतीय नाणें नाकारलें हें नाणें सर्व हिंदुस्थानांत चालतें, असें कामतांनी सांगितलें तेव्हा तो दुकानदार म्हणाला, 'पण हा देश निराळा आहे.' स्वातंत्र्य मिळून आज बारा वर्षे होऊन गेलीं, पण सरहद्दीवरच्या भारतीयांना, तेथील जमातींना शान, कुमान, काचीन, नाग या लोकांना भारत हा आपला देश आहे असें दृढनिश्चयाने वाटलें पाहिजे असे कसलेहि प्रयत्न काँग्रेसने केलेले नाहीत. चीनने मात्र अत्यंत धडाक्याने या जमातींत प्रचार चालविला आहे. उद्या युद्ध जुंपलें तर आपल्याला चीनकडे जाणे श्रेयस्कर आहे, ही भावना चीनचे नेते या प्रदेशांत निर्माण करून ठेवीत आहेत. म्हणजेच त्यांची भारतनिष्ठा विचलित करीत आहेत. पण विचलित करीत आहेत, असें तरी कां म्हणावें ? ती निष्ठा तेथे आपण कधी प्रस्थापित तरी केली होती का ? तिचें महत्त्व आज तरी आपण जाणलें आहे काय ?
 परंपरेचा अभिमान हे जें राष्ट्रभक्तीचें अत्यंत सोज्ज्वळ अंग त्याची जेथे ही परवड, तेथे परक्यांचा, आक्रमकांचा, जुलमी राज्यकर्त्यांचा द्वेष या दुसऱ्या अंगाची काय स्थिति असेल याची कल्पना सहज करता येईल. शत्रूवर प्रेम करावे हीच शिकवण काँग्रेसचे नेते भारताला देऊं लागले आणि द्वेष, प्रक्षोभ, संताप, ही कांही त्याज्य, हीन, निंद्य भावना आहे असा उपदेश येथे होऊं लागला. वास्तविक आक्रमकांचा द्वेष, मातृभूमीवर अत्याचार करणाऱ्यांविषयीचा जहरी संताप, तीव्र अमर्ष, ही अत्यंत शुद्ध व सात्विक