पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

प्रेरणा मिळत असते. हिंदूंचा हा अहंकार काँग्रेस पदोपदीं दुखवीत असे, आणि मुस्लिमांत तर तो निर्माणच झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानी वृत्ति बळावत गेली व मुस्लिम अत्याचार करूं लागले. पण त्याचा प्रतिकार करण्यासाठी काँग्रेसने संघटना उभारण्याचेहि नाकारलें. कारण राष्ट्रशत्रूंची हिंसा तिला वर्ज्य होती, आणि या अहिंसक वृत्तीमुळे भारताची घोर हत्या मात्र घडली.
 पण या अनुभवाने शहाणे होण्याचे मात्र काँग्रेसचे नेते नाकारीत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचें भावनात्मक ऐक्य घडविण्याचा विश्वप्रयत्न व्हावयास हवा होता. येथल्या परंपरेच्या ओघांत, अमेरिकेप्रमाणे सर्वांना मिसळून टाकण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अपार कष्ट करावयास हवे होते. पण राष्ट्रनिष्ठा याचा जो अर्थ प्रत्येक देश जाणतो तो भारताच्या नेत्यांना मान्य तरी नसावा किंवा कळत तरी नसावा असें वाटतें. नाहीतर मुस्लिम लीगशी- आम्ही जिनांचे वारसदार आहों म्हणून जाहीरपणे सांगणाऱ्यांशी- त्यांनी सख्य केलें नसतें. केरळातील मुस्लिम लीगचा जाहीरनामा मल्याळी भाषेत असल्यामुळे आपण वाचला नव्हता असें पंडितजी म्हणाले. पण तो वाचण्याची जरुरी काय होती ? तो काय असणार हे गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवाने ध्यानांत येण्यास हरकत नव्हती; पण त्यांना तें ध्यानांत घ्यावयाचेंच नाही हें खरें आहे. कारण ही काही अपवादात्मक गोष्ट नाही. द्रवीड कळहम्-चे नेते भारताच्या परंपरेचा वाटेल तो अवमान करतात, पण त्यांच्याशीहि काँग्रेस सख्य करते ! परक्या मिशनऱ्यांचे धर्मप्रसाराचे प्रयत्न भारताच्या ऐक्याला निश्चित घातक आहेत, असल्या धर्मान्तरानेच समाज पूर्वपरंपरेंतून तुटून निघतात, तिचे विरोधक बनतात. असें धर्मान्तर परके ख्रिस्ती मिशनरी फार मोठ्या प्रमाणावर करीत आहेत याचे शेकडो पुरावे उपलब्ध झाले आहेत. नियोगी कमिटीचा तसा अभिप्राय आहे. बैतुलपूरच्या महारोग्यांच्या इस्पितळांतील रोग्यांनी तशा तऱ्हेची तक्रार राज्यपाल पाटसकरांच्याकडे केलेली आहे. मंगलोरच्या 'क्रुसेडर्स लीग'च्या विरुद्ध हीच तक्रार आहे. नाग टोळ्यांच्या बंडाळीमागे परके मिशनरी आहेत असेंहि दिसून आले होते. भारतीय ख्रिस्ती लोकांनीसुद्धा परक्या मिशनऱ्यांना विरोध दर्शविला आहे. यासाठीच असें छळाने, कपटाने होणारें धर्मान्तर