पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

करून तिची भक्ति हा राष्ट्रीयतेचा निकष ठरवून ती भक्ति भारतांत दृढमूल करण्याऐवजी इतर समाजांना जें अप्रिय तें हिंदूंनीहि वर्ज्य मानावें, निदान त्याचा आग्रह धरू नये, त्याविषयी (म्हणजे स्वतःच्या आत्म्याविषयीच) उदासीन राहावें, असा उपदेश त्यांनी चालविला. स्वातंत्र्यानंतर भारत या नांवाचा आग्रहहि त्यांनी धरला नाही. कारण इतर धर्मीयांना तो तितका मान्य होणार नाही ! म्हणून 'भारत' याच्या जोडीला 'इंडिया' असें अभद्र नांव त्यांनी ठेवून दिलें. पूर्वपरंपरेची पूजा म्हणजे राष्ट्राच्या अहंकाराचें पोषण होय. तो अहंकार जेवढ़ा पोसेल, प्रबळ होईल तेवढे राष्ट्राचें कर्तृत्व पोसत असतें. त्याला दुखवणें म्हणजे राष्ट्राची हत्या होय. पण काँग्रेसच्या नेत्यांना याची जाणीवच नाही. कारण राष्ट्रीय स्वार्थ हें त्यांचें लक्ष्य नाही.
 मुस्लिम हे आपले धाकटे भाई आहेत, तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने, औदार्याने, वागावें असें तेव्हा सांगितलें जाई, आणि आजहि सांगितलें जातें. हा उपदेश फारच चांगला आहे. पण मुस्लिम हे भाऊ केव्हा ठरतील ? आईवर, या भारतभूमीवर त्यांचें आमच्याइतकेंच प्रेम असेल, आमच्याइतकीच अनन्यनिष्ठा असेल तेव्हा ! व्यास- वाल्मीकि, राम-कृष्ण, शिवछत्रपति, राणा प्रताप यांच्यावर आमच्याइतकीच त्यांची भक्ति असेल तेव्हा ! भारतांतल्या मुसलमानांतहि अशा राष्ट्रीय वृत्तीचे लोक होते. वास्तविक त्यांना काँग्रेसने भाई मानावयास हवें होतें, पण त्यांना जवळ करण्याऐवजी काँग्रेसने या थोर परंपरेचा ज्यांना अत्यंत तिटकारा, ती आपली परंपरा आहे असें मानावयास जे कधीहि तयार नव्हते म्हणजे जे खरोखरच आमचे भाई नव्हते त्या लीगच्या लोकांचा अनुनय करण्यांतच धन्यता मानली. त्या मुस्लिमांना संस्कृतचा द्वेष व उर्दूची भक्ति ! अर्थातच काँग्रेसलाहि उर्दूचें प्रेम; आणि तें किती ? तर हिंदी भाषासुद्धा संस्कृतनिष्ठ असण्यापेक्षा उर्दूनिष्ठ असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. शिवछत्रपति व राणा प्रताप हे हिंदूंना अत्यंत प्रिय. लगेच महात्माजींनी त्यांना मूढ व भ्रान्त ठरविलें ! हे दोन पुरुष म्हणजे भारताचा आत्मा आहे. आमची प्राणशक्ति माहे. त्यांची निंदा करण्याने आपण केवढी भयानक हिंसा करीत आहोंत याची महात्माजींना कल्पनाच नव्हती काय ? पण हें तरी कसें म्हणावें ? मुस्लिमांच्या पूर्व-परंपरेंत भयंकर कत्तली करणारे अनेक बादशहा होऊन गेले. पण त्यांना