पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १४५

कल्पनांमुळे काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या वर सांगितलेल्या परंपरेची एकनिष्ठ उपासना केली नाही. एवढेच नव्हे तर अनेक वेळां जाणूनबुजून तिची अवहेलना केली आहे. या देशांत हिंदूखेरीज मुस्लिम, ख्रिस्ती इ. अनेक परधर्मी समाज आहेत. त्या सर्वांच्या चित्तांत राष्ट्रनिष्ठा दृढमूल करून टाकण्यासाठी वरील परंपरेचा अभिमान त्यांच्या ठायीं उत्पन्न करणें व तो सतत प्रज्वलित ठेवणें अवश्य होतें. पण त्या परधर्मीयांना, आणि विशेषत: मुस्लिम समाजाला ही परंपरापूजा मान्य होणार नाही म्हणून काँग्रेस ने अत्यंत विपरीत धोरण स्वीकारले. या परंपरेचा आग्रहच तिने सोडला; इतकेंच नव्हे तर मुस्लिम लीगच्या अनुनयाची वृत्ति स्वीकारून हिंदूंच्या परंपराभक्तीचा अवमानहि केला. 'वन्दे मातरम्' हें आपलें राष्ट्रगीत, पण मुस्लिमांना तें अप्रिय; त्यामुळे एका मुस्लिमाचा जरी विरोध असेल तरी तें सभेंत म्हणूं नये अशी काँग्रेस सरकारची आज्ञा ! वास्तविक मुसलमान समाजहि कडवी राष्ट्रनिष्ठा जोपासूं शकतो, हें तुर्कस्थान, ईजिप्त यांच्या इतिहासावरून त्या वेळी प्रत्यक्ष दिसत होतें. तुर्कस्थानचा केमाल पाशा, ईजिप्तचा झगलूल पाशा यांचे लाखो अनुयायी मुस्लिमच होते. पण राष्ट्रनिष्ठेचा त्यांचा संदेश त्यांनी मोठ्या भक्तीने स्वीकारला. तुर्कस्थानांत अभिमान तुर्की भाषेचा, अरबीचा नाही. कुराणहि तुर्कीतून पढलें पाहिजे हा केमाल पाशाचा दंडक तुर्की मुस्लिमांनी मान्य केला. तुर्कस्थानांत जे पराक्रमी पुरुष होऊन गेले ते मुस्लिम नसले तरी तुर्कांनी वंद्य मानले पाहिजेत, तुर्केतर मुस्लिमांशी आपला संबंध नाही, आपण त्यांचा वारसा सांगू शकत नाही, हे परंपराभक्तीचें केमाल पाशाचे तत्त्वहि त्यांनी मान्य केलें. मुसलमानी धर्माच्या उदयापूर्वी तुर्कस्थानांत होऊन गेलेले जे अटिल्लासारखे वीर, त्यांचें गुण- संकीर्तन तुर्क आज करतात, त्यांचा अभिमान ते आपले पूर्वज म्हणून धरतात. इस्तंबूलचा सुलतान हाच मुसलमानांचा धर्मगुरु- खलिफा असे. पण राष्ट्रनिष्ठेच्या आड ती खिलाफत येते हें दिसतांच केमाल पाशाने ती नष्ट करून टाकली, आणि अखिल तुर्क समाजाने या कृत्याला पाठिंबा दिला. याचा अर्थ असा की, राष्ट्रनिष्ठेसाठी मुस्लिम समाजहि धर्मक्रांति करूं शकतो. भारतांतहि हेंच घडलें असतें. तसे घडूं नये म्हणून इंग्रजांचे प्रयत्न असत हे खरें; पण काँग्रेसच्या नेत्यांनी तरी तें घडविण्यासाठी काय प्रयत्न केले ? कांही नाही. त्यांना ही दृष्टिच नव्हती. सर्वधर्मीय समाजांची एक परंपरा निर्माण
 लो. १०