पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

आल्यावर याविषयीचे आपले विचार 'भवन जर्नल' मध्ये मांडले आहेत ते येथे देतों. चालू संदर्भात ते आपल्याला निश्चित उद्बोधक वाटतील. जगाचा प्रवास करीत असतांना श्री. मुनशी यांना प्रत्येक देशांत चैतन्य, उत्साह, आशावाद भरून राहिलेला दिसला. भारतांत मात्र सर्वत्र मरगळ, निरुत्साह, शून्य ! असें कां व्हावें याचा विचार एका पत्रांत त्यांनी मांडला आहे. त्या सर्व देशांत राष्ट्रनिष्ठा ही महाशक्ति अखंड प्रज्वलित ठेवण्याचे प्रयत्न होत असतात, आणि हिंदुस्थानांत तसे कांहीच प्रयत्न होत नसल्यामुळे ही अधोगति झाली आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. ते म्हणतात, सर्ववंद्य अशा महापुरुषांची पूजा, समाईक अशा पूर्वपराक्रमाची पराक्रमाची स्मृति, आणि सांघिक पराक्रमाची ईर्षा यांनी समाज एकजीव होत असतो. राष्ट्र घडत असतें. त्या दृष्टीने गेली १२ वर्षे भारताने व्यर्थ घालविली. अमेरिकेत शिक्षण-पद्धतिच अशी आहे की, कोणतेहि परकी समाज तेथे दोन तीन पिढ्यांत अमेरिकन होऊन जावे. वॉशिंग्टन, लिंकन हे माझे पूर्वज ही भावना तेथे नागरिकांच्या मनांत रुजविली जाते. त्या तऱ्हेचें शिक्षण देण्याचा कसलाहि प्रयत्न भारतांत होत नाही. आपली शिक्षणपद्धति अगदी फलशून्य आहे. हिंदूंनी आतापर्यंत आपल्या पूर्वपरंपरेचा अभिमान टिकविला होता. पण आणखी वीस वर्षांत हिंदूंविषयी हेंच म्हणता येईल की नाही याची शंका आहे. गेली शंभर वर्षे आपल्या नेत्यांनी ध्येयवृत्ति टिकविली होती. आता ती नष्ट झाली आहे. (भवन जर्नल २५-१-१९५९. कुलपतींचें पत्र. सारांशरूपाने.) जगांत कोठेहि आपण गेलो तरी एका देशांत असलेल्या भिन्न समाजांना एकरूप करून टाकण्याचे मार्ग ठरलेले आहेत. समान ईर्षा, समान पूर्वपराक्रम, समान महापुरुष- परंपरा ! त्या भूमीच्या प्राचीन परंपरेचा अभिमान जे धरतील तेच खरे राष्ट्रनिष्ठ. मग ते कोणत्याहि धर्माचे असोत. या दृष्टीने व्यास, वाल्मीकि, श्रीकृष्ण, श्रीरामचंद्र, महावीर, बुद्ध, विक्रमादित्य, चंद्रगुप्त, कबीर, अकबर, शंकराचार्य, शिवछत्रपति, लो. टिळक, महात्माजी ही परंपरा जो वंद्य मानील तोच राष्ट्रनिष्ठ भारतीय अशा वृत्तीची जोपासना येथे व्हावयास हवी होती. मुनशी म्हणतात तशी स्वातंत्र्योत्तर काळांत ती झाली नाहीच, पण स्वातंत्र्यपूर्व काळाची कथाहि तीच आहे! मानवता, विश्वबंधुत्व, विशालता यांविषयीच्या विपरीत