पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १४३

"माझी राष्ट्रभक्ति अन्यनिरपेक्ष नाही. या राष्ट्रभक्तींत परक्यांचे अहित तर येत नाहीच, तर उलट त्यांच्या हितासाठीच आम्हांला स्वातंत्र्य हवें आहे. इंग्लंडचा नाश होऊन भारताला स्वातंत्र्य मिळत असेल तर मला स्वातंत्र्य नको." असें प्रतिपादन ते करीत. सुदैवाने महात्माजींची हीं मतें राष्ट्राने फारशी मानली नाहीत. एकांतिक सत्य-अहिंसेवर काँग्रेसमध्ये कोणाचाहि विश्वास नव्हता. पंडितजी, वल्लभभाई यांनी केवळ धोरण म्हणून आम्ही अहिंसा मान्य करतों, शस्त्रयुद्ध शक्य नाही म्हणून हा सत्याग्रहाचा मार्ग आम्ही स्वीकारतों, असें अनेक वेळा जाहीर रीत्या सांगितलें आहे, लिहिले आहे. आम्हीं अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविलें असे काँग्रेसचे नेते आज सांगत असतात, पण तें खरें नाही हें त्यांचे त्यांनाच इतरांपेक्षा जास्त माहीत आहे. १९४७ पूर्वी येथे जे तीन चार सत्याग्रहाचे लढे झाले त्यांतल्या नेत्यांना किंवा सैनिकांना इंग्रजांविषयी प्रेम नव्हते. रौलेट कायदा, जालियनवाला बाग या अत्याचारांच्या स्मरणाने ब्रिटिशांविषयी लोकांत द्वेषच पसरला होता, आणि त्यामुळेच स्वातंत्र्य संग्राम शक्य झाले. लक्षावधि लोक स्वातंत्र्यसंग्रामांत उतरले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिशांच्या द्वेषामुळेच उतरले. पण असें जरी असले तरी परंपराभक्ति आणि शत्रुद्वेष या दोन भावनांचा जो पद्धतशीर योजनापूर्वक, प्रयत्नपूर्वक परिपोष व्हावयास हवा होता तो भारतांत झाला नाही. सर्व नेत्यांचे अग्रणी जे महात्माजी त्यांचा या वृत्तीला कडवा विरोध; दुय्यम नेत्यांची त्यांच्या सत्य-अहिंसेवर श्रद्धा नाही, पण धोरण म्हणून त्यांनी ती स्वीकारलेली ! त्यामुळे या महाशक्तीच्या जोपासनेविषयी ते उदासीनच राहिले. अशा स्थितीत मुळांतच शत्रुद्वेष ही जो मनुष्याची उपजत वृत्ति, तिच्यामुळे जेवढे शक्य तेवढे झाले. पण इतर राष्ट्रांनी सर्व सामर्थ्य खर्च करून, विश्वप्रयत्न करून, वाढविलेली ती महाशक्ति कोणीकडे आणि आईबापांनी टाकून दिलेल्या अनाथ कन्यकेप्रमाणे कशी तरी वाढलेली भारतांतील राष्ट्रनिष्ठा कोणीकडे !
 परंपराभक्ति हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा होय. या आत्म्याची उपासना इतर देशांत कशी चालवितात त्याचीं कांही उदाहरणें वर दिलींच आहेत. भारतीय विद्याभवनाचे कुलपति श्री. मुनशी यांनी सर्व जगाचा प्रवास करून