पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचं आव्हान

शी हुआंग आणि वू ती, त्याचप्रमाणे सम्राट् तै शुग, तै सु आणि चेंगीजखान यांचे स्मरण तो या कवनांत करतो. त्यांचा मुख्य गुण तो एकच जाणतो. गरुड हे लक्ष्य ठेवून ते धनुष्याची प्रत्यंचा ओढतात! यांतले कोणी अक्षरशत्रु होते, कोणी क्रूर होते; पण याबद्दल त्यांचा अधिक्षेप तो करीत नाही. सम्राट् तर सगळेच होते; पण हा कामगारप्रेमी नेता यासाठी त्यांची निंदा करीत नाही. ते सर्व चिनी होते, चीनचे सम्राट् होते, याचा त्याला अभिमान वाटतो; आणि यांचा जितका अभिमान तितकाच जपान, अमेरिका यांचा द्वेष त्याच्या गीतांतून जळजळत असतो. शत्रूच्या संहाराचा उल्लेख केल्याखेरीज तो आपलें गीत पुरें करीतच नाही. तीन हजार वर्षांपूर्वी आम्ही दिशादर्शक यंत्राचा शोध लावला, सतराशे वर्षांपूर्वी कागद तयार करण्याची कला हस्तगत केली, बाराशे वर्षापूर्वी मुद्रणयंत्र तयार केले, या पूर्वीच्या दिव्य इतिहासाचा जसा तो ठायीं ठायीं गौरव करतो, त्याचप्रमाणे तितक्याच आवेशाने व त्वेषाने शत्रूचे आम्ही निर्दाळण केलें हेंहि पावलोपावलीं तो अभिमानाने सांगतो. स्वाभिमान व परद्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे माओला माहीत आहे.
 आता या दृष्टीने भारताचा विचार केला तर काय दिसतें तें पाहा. भारतांत पाश्चात्त्य विद्येच्या प्रसाराबरोबरच पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली; आणि तिच्यांतूनच राष्ट्रनिष्ठेचा उदय झाला. प्रारंभीच्या काळांत लो. टिळक यांच्याकडे या चळवळीचें नेतृत्व होतें. त्या वेळीं राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा परिपोष येथे होत होता. टिळकांनी पूर्व परंपरेचा अभिमान आणि ब्रिटिशांचा द्वेष या दोन्ही भावना भारतीय जनतेच्या ठायीं अखंड ४० वर्षे तेवत ठेविल्या होत्या. त्यानंतर भारताचें नेतृत्व महात्माजींकडे आलें आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्वार्थ हें जें आमचें एकमेव लक्ष्य होतें त्यावरून भारतीयांची दृष्टि विचलित झाली. सत्य, अहिंसा, मानवता, विश्वबंधुत्व ही मूल्ये राष्ट्रीय स्वार्थापेक्षा श्रेष्ठ ठरली आणि त्यांचे प्रयोग येथे होऊ लागले. वैयक्तिक जीवनांत हीं तत्त्वें अत्यंत वंदनीय अशी आहेत. पण राष्ट्रीय जीवनांत त्यांचा प्रवेश होतांच त्यांना अत्यंत विपरीत रूप येऊं लागलें. तसें तें येणें अपरिहार्यच होतें. राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा सत्य, अहिंसा यांचा त्याग करणें युक्त नव्हे असें महात्माजींचें मत होतें.