पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १४१

जनतेंत होत नाही हें स्टॅलिनच्या ध्यानांत आलें; तेव्हा रशियाच्या उन्नतीसाठी त्याने मार्क्सवाद वाऱ्यावर उधळून दिला आणि परंपरेचा अभिमान व शत्रूचा द्वेष या राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा तो रशियन जनमानसांत पोष करूं लागला. पीटर दि ग्रेट, कुटुसाफ, अलेक्झँडर नेव्हस्की यांचा गौरव करून आपल्या पूर्वजांनी नेपोलियनचा, पोलंडचा व इतर आक्रमकांचा पराभव कसा केला याची वर्णनें तो करूं लागला. हे सर्व पुरुष सरंजामदार वा राजे होते. पूर्वी यांची निंदा होत असे. आता ऐक्यासाठी, स्फूर्तीसाठी, पराक्रमासाठी स्टॅलिन त्यांचा गौरव करूं लागला. या गौरवाचा सारार्थ एकच होता. राष्ट्ररक्षणासाठी त्यांनी अतुल धैर्याने केलेला शत्रूंचा संहार ! या गौरवाबरोबरच जर्मनीचा भयंकर द्वेष त्याने रशियन जनतेंत पद्धतशीरपणें पसरवून दिला. तें जगांतील कामगारांचें ऐक्य, ती आंतरराष्ट्रीय दृष्टि त्याने हद्दपार केली आणि जर्मनांचा द्वेष या आगीने त्याने रशियन कामगारांची मनें पेटवून दिली. कारण मरण-मारणाचा संग्राम तिच्यावाचून करणेंच शक्य नसतें. रशियाचे साफ निर्दाळण करण्यासाठीच जर्मन उद्युक्त झाले होते, तेव्हा त्यांचा संहार करावयाचा, कत्तली करावयाच्या तर नागरिकांच्या मनांत त्या शत्रूविषयी जहरी, आसुरी द्वेषच असला पाहिजे. असीम राष्ट्रभक्ति आणि तितकाच कडवा शत्रुद्वेष यांवाचून मरण-मारणाचा संग्राम होत नसतो; आणि म्हणून मार्क्सवाद, आंतरराष्ट्रीयता हें व्यापक तत्व सोडून देऊन सोव्हिएट नेत्यांनी राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा परिपोष जनतेंत करून जर्मनीवर विजय मिळविला.
 चीनचा माओ हा प्रारंभापासूनच शहाणा झाला होता. राष्ट्रनिष्ठा ही महाशक्ति आहे, त्या महाप्रेरणे वाचून आपल्या समाजाचा उत्कर्ष होणार नाही, त्याच्या अंगीं सद्गुणांचे संवर्धन होणार नाही, हें त्याने प्रारंभींच जाणलें होतें, आणि प्रत्येक कम्युनिस्टाने राष्ट्रनिष्ठ असलेच पाहिजे असा त्याने दंडक घालून दिला होता. राष्ट्रनिष्ठेचें द्विविध रूपहि त्याने ओळखलें होतें. पूर्व परंपरेचा निःसीम अभिमान आणि शत्रूविषयीचा कडवा द्वेष यांतूनच कर्तृत्वाची प्रेरणा मिळते, त्यामुळेच पशूचीं माणसें होतात याविषयी त्याला शंका नव्हती. म्हणून त्याने जीं राष्ट्रीय कवनें रचली त्यांपैकी प्रत्येकांत त्याने या द्विविध भावनांचे उद्दीपन केलेले आहे. सम्राट्