पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

जर्मनीवर त्याने विजय मिळविला हे त्याच्या सामर्थ्याचे द्योतक असें केव्हाच मानणें शक्य नव्हते आणि म्हणूनच ही दण्डसत्ता म्हणजे आपल्या लोकसत्तेला एक आव्हान आहे, तिच्याविषयी आपण चिंता बाळगली पाहिजे असें पश्चिमेकडच्या भांडवली राष्ट्रांना कधीच वाटले नाही. जर्मनीविषयी जो धसका त्यांच्या मनांत त्या काळांत होता, जी भीति होती आणि त्या राष्ट्रांतील मुत्सद्दयांच्या भाषणांतून हिटलरच्या अंमलाखाली जर्मनीच्या लष्करी बळाचा होत चाललेला विकास पाहून जी चिंता त्या वेळी व्यक्त होत असे तशा तऱ्हेची चिंता रशियाविषयी त्यांना कधी वाटली नव्हती. जर्मनी हा जरी दण्डांकित होता तरी आधीच्या शंभर वर्षांत तेथे हिटलरसारखी सर्वगामी दण्डसत्ता नव्हती. एक राजकरण सोडले तर इतर क्षेत्रांत तेथे व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य होते. त्यामुळे तेथे अद्ययावत् शस्त्रास्त्रे, औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, शिक्षण, संघटित समाज व कर्ते नेतृत्व हे षडंग बल सुसज्ज होणे सहज आहे हे पाश्चात्य लोकसत्तांना दिसत होते; पण तसा संभव सोव्हिएट रशियांत नसल्यामुळे त्या त्याच्याविषयी निश्चिंत होत्या.

आव्हान
 १९५० नंतर पाश्चात्य राष्ट्रांच्या या मनाला हळूहळू धक्का बसूं लागला; आणि १९९३ साली रशियाने आकाशांत बालचंद्र सोडण्यांत यश मिळविले तेव्हा मात्र पाश्चात्य देशा खडबडून जागे झाले, व सोव्हिएट रशिया व नवोदित चीन या सत्तांची दखल आपण घेतली पाहिजे, या सत्ता म्हणजे जगांतल्या लोकशाहीवर मोठे संकट आहे, यांची आपण उपेक्षा केली तर हळूहळू साम्यवादी तत्त्वज्ञान व तज्जन्य रानटी संस्कृति ही जगभर पसरेल व समता, बंधुता, स्वातंत्र्य या थोर तत्त्वांचा जगांतून लोप होईल हा विचार, ही चिंता लोकसत्तांच्या मनांत बळावू लागली. आज त्या देशांतील कर्त्या पुरुषांच्या ध्यानी मनीं स्वप्नी हा एकच विचार घुमत राहिलेला आपणांस दिसतो. या देशांतील विचारवंत, शास्त्रज्ञ, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ते यांचे लेख, त्यांची भाषणे, त्यांचे उद्योग हे पाहिले तर या चिंतेची कृष्णछाया पाश्चात्य जीवनावर पडून ते झाकोळून गेलें आहे हें पदोपदीं प्रत्ययास येतें.