पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

सध्या आपली अधोगति झाली आहे. आपल्या कोणत्याहि योजना यशस्वी होत नाहीत, कोणीहि आपल्या देशाचा अवमान करावा, सरहद्दींचा भंग करावा, आक्रमण करावें, आणि आपल्याला कसलाहि प्रतिकार करतां येऊ नये, इतके आपण दुबळे झालों आहोंत; चारित्र्य व कर्तृत्व यांचा या भूमींतून सर्वस्वी लोप झाल्यासारखें दिसावें अशी दशा झाली आहे, याचें प्रधान कारण म्हणजे काँग्रेसने व तिच्या नेत्यांनी स्वातंत्र्योत्तर काळांत (आणि कांही अंशीं पूर्वीच्या २५-३० वर्षांत) राष्ट्रनिष्ठा, धर्म, लोकसत्ता, बुद्धिनिष्ठा, शांततावाद, अहिंसा, सत्य, यांच्या विषयीचे जे सिद्धान्त म्हणजे जें तत्त्वज्ञान स्वीकारलें तें आहे.
 राष्ट्रनिष्ठा ही एक महाशक्ति आहे. पाश्चात्य विद्येचा भारतांत प्रसार झाल्यानंतर आपल्या नेत्यांनी आपली रसना व लेखणी झिजवून लोकांमध्ये ही निष्ठा दृढमूल केली, आणि तिच्याच प्रभावाने भारतांत क्रान्ति होऊं शकली. पण आज आपण वाणीने राष्ट्रनिष्ठेचा पुरस्कार करीत असलों तरी तिचें खरें स्वरूप जाणून घेऊन ती महाशक्ति जनमानसांत निरंतर तेवत ठेवण्याचे प्रयत्नं मात्र आपल्या हातून होत नाहीत. राष्ट्रभक्ति या निष्ठेची दोन अंगे आहेत. एक पूर्व परंपरेचा अभिमान आणि दुसरें व तितकेच महत्त्वाचे अंग म्हणजे परकीयांचा, देशाच्या शत्रूंचा, आक्रमकांचा द्वेष ! या दोन्ही अंगांचा जसा परिपोष व्हावयास हवा तसा येथे होत नाही व होण्याची आशा नाही. कारण येथे स्वीकारलेले तत्त्वज्ञान हें त्यांना विरोधी आहे.
 पूर्व परंपरेचा अभिमान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा आहे. त्या अभिमानावांचून कोणत्याहि राष्ट्राला आजवर पराक्रम करता आलेला नाही व पुढे येणार नाही. कम्युनिस्ट हे या अभिमानाचे शत्रु आहेत किंवा होते. मार्क्सवादाने राष्ट्रनिष्ठेची व परंपरापूजेची कमालीची हेटाळणी केली आहे. लेनिन व त्याचे सहकारी क्रान्तीनंतर प्रारंभी हेंच करीत असत. रशियाचा इतिहास १९१७ सालापासून सुरू होतो असें ते म्हणत, आणि त्या दृष्टीने लिहिलेला इतिहासच शाळा-कॉलेजांत शिकवीत असत. पण जर्मन राष्ट्र समर्थ होऊं लागले आणि हिटलरचें आक्रमण रशियावर होणार असा धोका उत्पन्न झाला त्या वेळी केवळ अर्थवादी तत्त्वज्ञानाने पराक्रमाचें स्फुरण