पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १३९

पंधराव्या शतकांत पश्चिम युरोपांतील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड इ. राष्ट्रांचा झपाट्याने उत्कर्ष होऊं लागला. तो त्याने त्या वेळीं ग्रीक विद्येचें म्हणजेच तत्त्वज्ञानाचें जें पुनरुज्जीवन केलें त्यामुळे झाला असें इतिहासकार सांगतात. तोपर्यंत अनियंत्रित राजसत्ता, परमेश्वरप्रणीत धर्मसत्ता, शब्दप्रामाण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, हें त्या देशांचें तत्त्वज्ञान होतें. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर हे सर्व पालटलें, नष्ट झालें. त्या जागी व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, लोकसत्ता, बुद्धिप्रामाण्य, समता, हें तत्त्वज्ञान आलें, आणि यामुळेच त्या पाश्चात्य राष्ट्रांचा उत्कर्ष झाला व पूर्व युरोपमधील पोलंड, बल्गेरिया, रुमानिया, रशिया इ. राष्ट्रांनी ही नवीं तत्त्वें स्वीकारली नाहीत म्हणून त्यांचा अपकर्ष झाला याबद्दल इतिहासवेत्त्यांत दुमत नाही. गेल्या शतकाच्या अखेरीस जपानचा उत्कर्ष झाला. अल्पावधीत तो देश महत्पदाला चढला व बलाढ्य झाला याचें कारण त्याने राष्ट्रनिष्ठा, समता, विज्ञाननिष्ठा, प्रयत्नवाद ही पाश्चात्त्य संस्कृति, समाजरचनेचीं ही पाश्चात्त्य तत्त्वें अंगीकारली हें होय असेंच सर्व पंडितांचें मत आहे. इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून भारतांतील सर्व प्रांत इस्लामी आक्रमणाला बळी पडत गेले आणि त्यांतून ते मुक्त होतात न होतात तोच पुन्हा ते पाश्चात्त्य आक्रमणाला बळी पडले. याची मीमांसाहि अशीच केली जाते. शब्दप्रामाण्य, अपरिवर्तनीय अपौरुषेय धर्म, अनियंत्रित राजसत्ता, जन्मनिष्ठ उच्चनीचता, अतिरिक्त निवृत्तिवाद, त्यांतून आलेला दैववाद, ही त्या काळांत भारताची संस्कृति होती, समाजरचनेचीं तत्त्वें होतीं, त्याचें तत्त्वज्ञान होतें. म्हणून मोगल, इंग्रज, फ्रेंच, डच यांच्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही; आणि आज इतिहासकार असें सांगतात की, हें तत्त्वज्ञान निषिद्ध मानून गेल्या शंभर वर्षांत त्याने व्यक्तिस्वातंत्र्य, समता, राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, इहवाद, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, धर्माची परिवर्तनीयता हें तत्त्वज्ञान स्वीकारलें म्हणूनच ब्रिटिशांसारख्या बलाढ्य राष्ट्राशी लढा करून त्याला स्वातंत्र्य मिळवतां आलें. राष्ट्राचा उत्कर्ष वा अपकर्ष त्याने स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानामुळे होतो या विधानाचा अर्थ एवढ्यावरून स्पष्ट होईल. तो जमेस धरून मला असे म्हणावयाचे आहे की, स्वातंत्र्योत्तर काळांत आपण जे तत्त्वज्ञान स्वीकारले आहे त्यामुळेच