पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यांसारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करतां लोकजागृति करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतांत सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता- मोहिनीचे दर्शन होतांच हे सर्वच पतित आणि भ्रष्ट झाले काय ? आज भारतांत वर उल्लेखिलेल्या नेत्यांच्या तोडीचा एकहि श्रेष्ठ नेता नाही हें खरें आहे; आणि दन्याखोऱ्यांतून हिंडून लोकजागृति करणारे तरुण तर अपवादालाच आहेत हेहि खरे आहे. पण याचीच कारणें आपण शोधलीं पाहिजेत. स्वातंत्र्यसंग्रामांत निर्माण झालेलें तें शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, तें असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटतें. सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि नेते इतके दुबळे, इतके नादान केवळ सत्ताप्राप्तीमुळे झाले असतील तर भारताला सध्याच्या आपत्तींतून डोके वर काढणे कधीच शक्य नाही असा त्याचा अर्थ होईल. रशियांत राज्यक्रान्ति झाली, चीनमध्ये राज्यक्रान्ति झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाहि झाला नाही. मग भारतांतच तसें कां व्हावें ? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय ? कीर्ति, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामर्थ्यच भारतीयांच्या ठायी नाही काय ? असें म्हणवत नाही. याची कांहीतरी निराळी कारणें असली पाहिजेत. तींच आता शोधावयाची आहेत.
 कोणत्याहि समाजाचा वा राष्ट्राचा उत्कर्ष आणि विलय, किंवा त्याला प्राप्त झालेली कोणतीहि उतममध्यमाधम दशा ही त्याने स्वीकारलेल्या समाजसंघटनेच्या, समाजरचनेच्या मूलभूत तत्त्वांवर म्हणजेच त्याच्या सामाजिक वा राष्ट्रीय तत्त्वज्ञानावर अवलंबून असते. समता, विषमता, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिष्ठा, समाजवाद, साम्यवाद, लोकसत्ता, दण्डसत्ता, जातिनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, हीं सर्व समाजरचनेची तत्वें होत. यांतील जीं कोणतीं तत्त्वें एखाद्या समाजाने स्वीकारली असतील ती सर्व मिळून त्यांचे तत्त्वज्ञान होतें, आणि त्याने स्वीकारलेलें हें तत्त्वज्ञान त्यावर त्याचा उत्कर्षापकर्ष अवलंबून असतो. चौदाव्या