पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १३७

घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असें कोणालाच वाटत नाही. अर्थात् या संयमामुळे, या शांततावादामुळे जगांत भारताची कीर्ति पसरत चालली आहे हें खरें आहे, पण कीर्ति आणि सामर्थ्य यांत फरक आहे हें आपण जाणलें पाहिजे.
 भारताला इतकें दौर्बल्य कशामुळे आले याची कारणमीमांसा गेल्या दोन प्रकरणांत केली आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतांतले काँग्रेसचे नेते हे राजकारणांत मग्न आहेत. समाजकल्याणाच्या योजना यशस्वी करून दाखविण्यास त्यांना वेळ नाही. स्वार्थ, सत्तालोभ, धनलोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामर्थ्यंच तिच्या ठायीं राहिलेलें नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असें दिसतें. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करतां येत नाहीत, मग ठरल्या वेळांत ठरलेल्या भांडवलांत एखादी योजना यशस्वी करून दाखविणें लांबच राहिलें. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालय यांविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तृत्वशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांचीं लक्षणें होऊन बसलेली दिसतात. हें सर्व सांगून भारतांतील राजकीय पक्ष, त्यांचे नेते व सामान्यतः सर्वच अधिकारी व कार्यकर्ते हे चारित्र्यहीन, धर्महीन, ध्येयहीन झाले आहेत, हीनवृत्तीचे व भ्रष्ट झाले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रांत अपयशी होत आहोंत असा निष्कर्ष तेथे काढला होता, आणि आपण यासाठी अत्यंत तळमळीने उपायचिंतन केलें पाहिजे असें म्हटलें होतें.
 हे उपायचिंतन करावयाचें तर वरील कारणमीमांसेच्याहि पलीकडे आपण गेलें पाहिजे, आणि या कारणांचीहि कारणमीमांसा केली पाहिजे. आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी कां झालों याचा विचार आपण केला पाहिजे. बारा वर्षांपूर्वीच आपण स्वातंत्र्य मिळविलें. त्याच्या आधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्या वेळीं राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधि लोक संग्रामांत उतरले होते, आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलें. गेल्या शंभर वर्षांच्या काळांत रानडे, टिळक, सावरकर, लजपतराय, गांधी,