पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

देण्याइतकें सामर्थ्य प्राप्त होण्यास त्याला अजून कालावधि लागेल, असें वाटत होतें. पण प्रत्यक्षांत चीनचेंच आक्रमण आले आणि तेंहि ही लेखमाला पुरी होण्याच्याहि आधी !
 वास्तविक हेहि खरे नाही. कारण प्रत्यक्षांत आक्रमण झाल्याला चार वर्षे होऊन गेलीं आहेत. १९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रान्त बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी कांही राजकीय धोरणाने तें भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्तच भयानक आहे असें ठरतें. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ साली प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पांच वर्षांत भारतासारख्या एका मोठ्या राष्ट्राला शह देण्याइतकें सामर्थ्यं, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हें जितकें आश्चर्यकारक, तितकेंच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकहि प्रश्न सोडविण्यांत आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामर्थ्य आपल्याला नाहीं, आणि चीनला मात्र ४-५ वर्षात भारताच्या सरहद्दींत घुसून केवळ भारताच्याच नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतकें सामर्थ्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झालें आहे, तेव्हा इतक्यांतच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीति चीनला नाही, आपण केलेला मनसुबा यूनो संघटनेला अमान्य झाला तर जगांतली अनेक बलाढ्य राष्ट्र आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही, आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नांतसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन, पाकिस्तान (आणि गोवासुद्धा) यांच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहों असें, भारताचे शास्ते सर्वांना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दींचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असतांना, या