पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : ५

राष्ट्रीय स्वार्थाची उपासना



 'लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान ' या लेखमालेतील पहिला लेख जुलै १९५९ च्या 'वसंत' अंकांत आला. त्या आधी मे महिन्यांत हा विषय मी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांत मांडला होता. त्याचे आधी दोन महिने या विषयाची मी तयारी करीत होतों. म्हणजे विषय मनांत आला त्या वेळी चीनच्या दण्डसत्तेचें आव्हान भारताला इतक्या त्वरित येऊन पोचेल, चीन भारतावर उघड उघड लष्करी आक्रमण करून हे आव्हान त्याच्या तोंडावर अशा रीतीने फेकील असें स्वप्नांतहि आले नव्हतें. आता या लेखमालेत या विषयाची चर्चा केवळ तात्त्विक भूमिकेवरून केली होती असे मुळीच नाही. रशिया किंवा चीन या दण्डसत्तांपासून भारताच्या लोकसत्तेला नजीकच्या भविष्यकाळांत धोका पोचणार आहे हें मनांत आल्यामुळेच हा विषय असा विस्तृतपणे मांडावा असें मी ठरविलें. तरी पण आक्रमणाची ही लाट ४-५ महिन्यांतच भारताच्या सीमांवर येऊन थडकेल याची कल्पनाहि त्या वेळी मला नव्हती. रशियाच्या वाढत्या सामर्थ्याविषयी अमेरिकन पंडितांनी व शास्त्रज्ञांनी लिहिलेले लेख माझ्या वाचनांत आले त्या वेळी सोव्हिएट दण्डसत्तेच्या लष्करी सामर्थ्याची भारतानेहि पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणेच दखल घेतली पाहिजे, त्या आक्रमणाची भारतालाहि त्यांच्या इतकीच भीति आहे हा विचार प्रामुख्याने मनांत आला. चीनची दण्डसत्ता त्या वेळी डोळ्यांसमोर नव्हती असें नाही, पण आव्हान येईल तें रशियाकडून येईल अशी कल्पना होती. कारण सामर्थ्य वाढले आहे तें रशियाचें वाढले आहे, चीन त्याच मार्गाने जात असला तरी भारताला आव्हान