पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, घर नाही आणि ज्याच्या बळावर प्रपंच यशस्वी करावयाचा तें तरुण रक्त थंड, उदासीन होऊन बसले आहे, आणि आश्चर्य असें की, दण्डसत्तांनी हें सर्व सामर्थ्य अल्पावकाशांत प्राप्त करून घेतलें आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, पश्चिम जर्मनी अशीं बलाढ्य राष्ट्र समोर उभी असतांना रशियाचा क्रुश्चेव्ह त्यांना वाटेल त्या धमक्या देण्यास समर्थ आहे. त्याच्या हातून बर्लिन सोडवून घेण्याचे यांना सामर्थ्य नाही. चीनची वृत्तिहि तशीच आहे. ताडकन् सैन्य पाठवून त्याने तिबेट घेऊन टाकलें. या दण्डसत्तांना कशाचीहि भीति वाटत नाही. आपला इष्ट हेतु त्या क्षणार्धात साध्य करून घेतात. भारतासारख्या सर्व जगाने प्रशंसिलेल्या, सर्व जगांत मोठी प्रतिष्ठा असलेल्या लोकसत्तेचा वाटेल तसा पाणउतारा त्या करूं शकतात. अशा लोकसत्तांचे आव्हान स्वीकारण्यास भारत समर्थ व्हावा अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची स्वाभाविकच तीव्र इच्छा असणार, म्हणूनच त्यासाठी अत्यंत तळमळीने आपण उपायचिंतन केलें पाहिजे. पुढच्या प्रकरणाचा विषय तोच आहे.

+ + +