पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १३३

चीन आपला सारखा अवमान करीत आहे, पण यूनोमध्ये त्याचा पक्ष सोडून द्यावा हें धैर्य आपल्याला नाही. पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वाचा सारखा भंग करीत आहे, त्याला पायबंद घालण्याचें सामर्थ्य आपल्याजवळ नाही. त्यामुळे दुबळें तत्त्वज्ञान आपल्याला सांगावें लागत आहे. देशांत मोठी संघटना म्हणजे काँग्रेस तिला ठायीं ठायीं तडे गेले आहेत, म्हणून ती निष्प्रभ झाली आहे. कारखानदार साखर महाग करतात, रॉकेल महाग करतात, व्यापारी नागरिकांची लूट करतात, त्याचें नियंत्रण सरकार करूं शकत नाही. साठेबाजी अत्यंत मोठ्या प्रमाणांत चालते, ती नष्ट करावी अशी सरकारची इच्छाहि आहे, पण साठेबाजांपुढे सरकारला नांगी टाकावी लागते. 'या साठेबाज व्यापाऱ्यांमुळे सर्वत्र महागाई होत आहे. त्यांचें हे धोरण निंद्य आहे.' असें, सर्व सत्ता हाती असूनहि अजितप्रसाद जैनांसारखे केंद्रमंत्री हताशपणे म्हणून चडफडत म्हातारीप्रमाणे बोटे मोडीत बसतात. काकासाहेब गाडगिळांच्यासारखे राज्यपाल हाती सत्ता असूनहि, साखर वर्ज्य करणें हा उपाय योजतात. अजून सत्ताधारी उपोषण करीत नाहीत हे नशीब! महागाई, बेकारी सारखी वाढत आहे. स्वस्ताई करावी, लोकांना रोजगार द्यावा अशी सरकारला तीव्र तळमळ लागून राहिलेली आहे. पण महागाई वाढते आहे. बेकारी वाढते आहे, सरकार कांही उपाययोजना करूं लांगले की महागाई जास्तच वाढते. साखरेच्या बाबतींत आणि अन्नधान्याचा जो सरकारी व्यापार (स्टेट ट्रेडिंग) व्हावयाचा आहे त्या बाबतींत हें स्पष्ट दिसून आले आहे. आपल्या तिजोरीचा विचार केला तर धक्काच बसतो. कर्जे, कर्जे- इतकी कर्जे वाढली आहेत की, कांही वर्षांनी आपलें सर्व राष्ट्रीय उत्पन्न व्याजापायीं द्यावें लागेल कीं काय अशी चिंता वाटू लागली आहे. आंध्र, म्हैसूर, ओरिसा, मध्यप्रदेश या प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांनी परवा हीच चिंता व्यक्त केली. आम्ही कर्जे काढली खरी; पण व्याज कोठून द्यावयाचे या फिकिरीत आम्ही आहों, असें ते म्हणाले. (टाइम्स- ७ ऑगस्ट १९५९).
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बारा वर्षांत सत्ताधारी पक्ष जो काँग्रेस त्याच्या हातीं कर्तुमकर्तुम् सामर्थ्य असूनहि आज आपली अशी दीन दशा झाली आहे. प्रतिकार- सामर्थ्य नाही, संघटना नाही, उत्पादन- सामर्थ्य नाही, कर्तृत्व