पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

येऊ देण्याची व्यवस्था झालेली आहे. चमत्कार असा की, नवा नेता मिळणार नाही अशी भीति युरोपीय पंडितांनी दण्डसत्तांविषयी व्यक्त केली होती, पण तेथे अशी वाण पडली नाही. लेनिननंतर स्टॅलिन आला. स्टॅलिननंतर क्रुश्चेव्ह आला, आणि पहिल्याच वेगाने त्याने प्रगति चालू ठेवली आहे. चीनमध्ये मावत्सेतुंग याला नव्या पिढीच्या लोकांनी खुशाल बाजूला केला. आपल्याकडे पंडितजी राजीनामा देतों असें म्हणाले तेव्हा वास्तविक अनेकांनी धैर्याने पुढे येऊन, आम्ही ती धुरा खांद्यावर घेतों, असें म्हणावयास पाहिजे होतें आणि ती घ्यावयास हवी होती. पण असें तर झालें नाहीच, उलट तुम्ही गेलात तर आम्ही पोरके होऊं, असें म्हणून काँग्रेसजन रडूं लागले. पंडितजी बाजूला होतांच काँग्रेस शतखंड होईल ही सर्वांचीच खात्री आहे. ते गेले तरी आम्ही संघटना टिकवून धरूं असें म्हणण्याची धमक, तें तेज, तें कर्तृत्व एकांतहि नाही. कोणालाहि हा आत्मविश्वास नाही. उलट दण्डायत्त चीनमध्ये मावत्सेतुंगला मुद्दाम बाजूला करून सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची धमक त्याच्या अनुयायांनी दाखविली. कर्तृत्वाची अखंड परंपरा निर्माण करणें हें लोकशाहीचें लक्षण. असे असून दण्डसत्तेने ती निर्माण केली. रशियात सेनापति कमी पडले नाहीत, मुत्सद्दयांची वाण नाही, शास्त्रज्ञ, ग्रंथकार, संयोजक, कारभारी, शिक्षणतज्ज्ञ, वैद्य, इंजिनीयर, कलाकार सर्व, सर्व क्षेत्रांतले लोक विपुल प्रमाणांत निर्माण होत आहेत. अमेरिकेतले चिकित्सक, लोकवादी पंडित तेथे जाऊन पाहून हें सांगत आहेत, आणि रशियाचे बालचंद्र जगाला तें प्रत्यक्ष दाखवीत आहेत; हिंदुस्थानांत अन्न व वस्त्र निर्माण करण्याच्या योजना पार पाडण्याइतकें, साधे हिशेब बरोबर ठेवण्याइतकेहि कर्तृत्व मात्र पैदा होत नाही. आणि हिंदुस्थानांत लोकसत्ता आहे!! याच्यावर कोण विश्वास ठेवील?
 या गेल्या दोन प्रकरणांत आपण काय पाहिलें ? आपल्या प्रतिज्ञा फार भव्य आहेत, योजना उत्तम आहेत, पण त्या कार्यवाहींत आणणारे सेनापति आघाडीवर उपस्थित नाहीत. सर्वत्र राजकारण प्रभावी झालेले आहे. देश धर्महीन, चारित्र्यहीन होत चालला आहे. आपल्या शासनाच्या मागे ध्येयवादी, कार्यकनिष्ठ तरुण उभे नाहीत, त्यामुळे आपली काय दशा होत चालली आहे पाहा. भारत सरकार सामर्थ्यहीन व पंगु होऊन बसलें आहे.