पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १३१

की, तरुण शक्ति आली तर तिच्याबरोबर उद्दाम आवेश, उसळणारें रक्त, तीव्र मतभेद, स्वतंत्र व्यक्तित्व, हेहि येणार; आणि आपल्या मताला मुरड घालून त्या तरुण उसळीलाहि अवसर दिला पाहिजे. तरुण शक्तीचें चैतन्य यांतच असतें. तेव्हा वत्सलतेने त्यांचीहि वाढ होऊं दिली पाहिजे. तो उद्दाम व्यक्तित्वाचा आवेश ज्यांच्या ठायीं आहे तेच खरे तरुण. बाकी सर्व वयाने तरुण. ते पित्यापुढे गम खातात, मान खाली घालतात, पण तो पितृभक्तीमुळे नव्हे तर पित्याच्या जिंदगीसाठी. सुज्ञ पित्याला असे तरुण आवडत नाहीत. त्याला तरुण चैतन्य आवडते. पण चैतन्याला संभाळायचे तर दर वेळेला, असें असेल तर चालता हो, तसें करशील तर बाहेर निघावें लागेल असें म्हणून चालणार नाही, हेंहि त्याला समजतें. तसें केल्यास कर्ते तरुण पुत्र निघून जातात आणि मग संसार उघडा पडतो, आणि त्या तरुणांचें कर्तृत्व बाहेर गेल्यावर वाढीस लागत असले तरी पुष्कळ वेळा बाहेरहि चांगला अवसर न मिळाल्यामुळे तें खुरटून जातें. म्हणजे यांत, दोघांचाहि नाश होतो. म्हणून संसार संभाळण्याची चिंता ज्या वृद्ध पित्याला आहे तो तरुणांना त्यांच्या व्यक्तित्वाच्या दाहक तेजासकट स्वीकारण्याची सिद्धता ठेवतो. मन मोठे करतो, उदार करतो आणि त्यामुळे संसाराची परंपरा पूर्व वैभवानिशी टिकून राहते. ज्या वृद्धांना तरुण हवे असतात पण त्यांचें चैतन्य नको असतें, त्यांना ते फक्त पाय चेपण्यापुरते हवे असतात. बाजार करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी हवे असतात. काँग्रेसश्रेष्ठींना आज तरुण हवे आहेत ते तसे हवे आहेत. तसे त्यांना लाखांनी मिळालेलेहि आहेत. पण असें असूनहि 'नेहरूनंतर कोण' हा प्रश्न सोडविण्यास ते असमर्थ आहेत. ते समर्थ असते तर त्यांना काँग्रेसमध्ये राहतांच आले नसतें. आम्ही आमच्या समस्या लोकशाही मार्गानेच सोडविणार असे ब्रीद मिरविणाऱ्या काँग्रेसने महात्माजी दिवंगत झाल्याबरोबर लोकशाहीचें एक महान् तत्त्व, आद्यतत्त्व नष्ट करून टाकले. त्यामुळे लोकशाहीमध्ये राष्ट्राच्या वृक्षाला दर क्षणाला जी नव्या नव्या उन्मेषाची विरूठी फुटत असते, नवे पल्लव येत असतात, नवा मोहोर येत असतो तो येण्याचें बंद झालें. तरुण कर्तृत्वाचा फुलोरा गेल्या बारा वर्षांत काँग्रेसमध्ये दिसून येत नाही, नवा फलबहार या वृक्षाला येत नाही. कारण बारा वर्षांपूर्वीच नवे कोंभ, नवे धुमारे छाटून टाकण्याची व पुन्हा न