पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : ३

असतो. तेव्हा राजकीय दृष्टीने प्रबुद्ध व राष्ट्रनिष्ठेने प्रेरित झालेला असा अखिल समाज या साधनसंभाराच्या मागे उभा असला तरच रणांगणांत विजय प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि तो साधनसंभार व हा प्रबुद्ध समाज यांच्यामागे सर्व क्षेत्रांतले प्रभावी नेते ही अंतिम आवश्यकता असते. तत्त्ववेत्ते, राजकारणी, मुत्सद्दी, रणपंडित, अर्थवेत्ते, इतिहासपंडित, नियोजक, संघटक असे सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रांतले कर्ते पुरुष हेच या सर्व सामर्थ्यांचा उत्कृष्ट विनियोग करून राष्ट्राला विजय प्राप्त करून देत असतात. हल्लीच्या युद्धांतले यश हे इतक्या विविध प्रकारच्या बलावर, या सर्वांगीण संपन्नतेवर अवलंबून असतें. सोव्हिएट रशिया किवा नवचीन यांसारख्या मानवी व्यक्तित्वाचे निर्दाळण करण्यांतच भूषण मानणाऱ्या, यमदण्डाने राज्य करणाऱ्या, अघोरी, जुलमी सत्तांना हीं विविध बलें, ही सर्वांगीण संपन्नता निर्माण करता येईल अशी पाश्चात्त्य लोकसत्तांना कल्पना नव्हती. कारण या सर्व संपन्नतेचें मूळ कारण व्यक्तिस्वातंत्र्य हें आहे; सर्व बंधनांतून मुक्त होऊन वाटेल त्या विषयांत अनिर्बंधपणें संचार करणाऱ्या मनालाच सृष्टीची गूढ उकलतात, अशी अकुठित बुद्धिच विज्ञान रहस्य आकळू शकते असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता; आणि तें व्यक्तिस्वातंत्र्य सोव्हिएट रशियांत केवळ अभावानेच असल्यामुळे वर सांगितलेली षडंग बलें तेथे निर्माण होऊ शकतील असें कोणालाच वाटत नव्हतें.
 दुसऱ्या महायुद्धांत सोव्हिएट रशियाचा जय झाला तरी वरील मतांत फारसा बदल करण्याचें कारण नाही असेंच पश्चिमेचें मत कायम होतें. एक तर ज्या जर्मनीवर रशियाने विजय मिळविला तो अनेक राष्ट्रांशी एकदम लढत होता. तेव्हा त्याचा पराभव झाला यांत कसलेच नवल नव्हतें. उलट त्याने इतकी वर्षे जगाची दमछाट केली हीच नवलाची गोष्ट होती. आणि दुसरें म्हणजे सोव्हिएट रशियाला विजय मिळाला तो पाश्यात्य राष्ट्रांनी त्याला जें अपरिमित साह्य केलें त्यामुळे मिळाला हे जगजाहीर होतें. अफाट शस्त्रसामग्री, विमानें, तोफा, रणगाडे, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रांतले शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अमेरिकेने रशियाला पुरविले होते. आपल्या घरचें कुबेराचें भांडार खुलें करून अन्नधान्य, कपडालत्ता, वैद्यकीय उपकरणें, औषधे इ. अनेक प्रकारचें साहित्य अमेरिकेने रशियाकडून लुटविलें होतें. त्यामुळे