पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

दुय्यम होता. चॅथॅम हा अत्यंत निःस्पृह व फटकळ होता. पण त्याच्या ठायीं असामान्य कर्तृत्व होतें. म्हणून न्यू कॅसलने त्याला ठेवून तर घेतलेंच; शिवाय युद्धाची सर्व जबाबदारी, सर्व सूत्रे त्याचे हातीं दिलीं आणि हेंच धोरण पुढे डिझरायली, ग्लॅडस्टन यांनी चालू ठेवलें होतें. दुसऱ्या महायुद्धांत ॲलन ब्रूक हे ब्रिटनचे लष्करी सूत्रधार होते. त्यांनी 'टर्न ऑफ दि टाईड' हा ग्रंथ नुकताच लिहिला आहे. पंतप्रधान चर्चिल यांच्याशी त्यांचे अनेक वेळां कसे तीव्र मतभेद झाले त्याचें वर्णन त्यांनी त्यांत दिले आहे. चर्चिलचें धोरण चुकीचें आहे, अशी टीका अनेक वेळां त्यांना करावी लागली. चर्चिल कित्येक वेळां चिडून जात असे, पण दुसऱ्या दिवशीं ॲलन ब्रूक यांचे म्हणणे मान्य करीत असे. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळीं ही स्थिति! ब्रिटन, अमेरिका या देशांतील पक्षांचे इतिहास पाहतां असें स्पष्ट दिसून येतें की, पक्ष सत्ताधारी झाल्यावरहि त्याच्या श्रेष्ठींनी हेंच उदार, समावेशक धोरण दृढनिश्चयाने चालू ठेवलें होतें. तसे त्यांनी केलें नसतें तर ते पक्ष टिकून राहिलेच नसते; आणि ब्रिटनची लोकशाहीहि टिकली नसती. काँझरवेटिव्ह, लिबरल, लेबर या दिसायला ढोबळ अशा तीन विचारसरणी दिसतात, पण त्या प्रत्येक तत्वज्ञानाच्या अभ्यंतरांत कितीतरी भिन्न प्रणाली असतात व आजहि आहेत. पण ब्रिटनमधल्या सर्व विचारसरणींचा समावेश दोन-तीन पक्षांतच होतो. याचा अर्थच असा की, ते अत्यंत समावेशक आहेत; पण भिन्न मतप्रणाली किंवा विचारसरणी यापेक्षाहि हा प्रश्न निःस्पृह रामशास्त्र्यांना समाविष्ट करून घेण्याचा आहे. कारण तत्त्वज्ञान तेंच असले तरी त्याच्या व्यवहारांत अनेक मतभेदाचे प्रश्न निर्माण होत असतात. त्या वेळीं निःस्पृह तरुणांना अवसर मिळाला तरच त्यांचे कर्तृत्व वाढीस लागतें, आणि मग पहिले श्रेष्ठी वृद्ध झाले की त्यांची जागा घेण्याच्या वेळीं ते समर्थ होऊन बसलेले असतात. काँग्रेसश्रेष्ठींच्या असहिष्णु धोरणामुळे ही प्रक्रियाच बंद पडली आणि आज काँग्रेस निस्तरुण झाली आहे.
 वृद्ध पित्याला आपल्या घरांत कर्ते तरुण पुत्र असावेत अशी इच्छा असते. आपण थकलो आहों, आता संसाराचा गाडा ओढण्यास तरुणांची शक्ति, त्यांचे बळ, त्यांचा उत्साह, त्यांचें सामर्थ्य हें अवश्य आहे, तेव्हा त्यांनी भार उचलावा असें त्याला वाटत असतें. पण सुज्ञ पिता हेहि जाणतो