पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथे : १२९

काय, ते आठवून पाहावें. आलाच नव्हता. पंडित जवाहरलालजी आहेत, वल्लभभाई आहेत, सुभाषचंद्रजी आहेत, राजेन्द्रबाबू आहेत, राजाजी आहेत, कोणीहि ही धुरा खांद्यावर घेईल असा विश्वास भारताला त्या वेळी वाटत होता आणि तो विश्वास सार्थ होता, हे या थोर पुरुषांनी पुढे दाखवूनहि दिले. पण टिळक, महात्माजींचें हे उदार धोरण, आपल्या सान्निध्यांत अत्यंत विरोधी प्रणालींना विकसूं देण्याची ही लोकशाही वृत्ति, त्यांनी स्वतः मात्र जोपासली नाही. महात्माजींच्या बरोबरच तिचा अंत झाला. भिन्न विचारसरणी, भिन्न मतप्रणाली या त्यांनी एका घावांत छिन्न करून टाकल्या. याचें गमक म्हणून एक साधा प्रश्न आपण मनाला विचारून पाहावा. मोतीलाल, जवाहरलाल, वल्लभभाई, विठ्ठलभाई, जयप्रकाश, नरेंद्र देव हे महात्माजींच्यावर ते जिवंत असतांना जितकी कठोर, निःस्पृह टीका करीत असत तशी पंडितजींच्यावर टीका करणारा रामशास्त्री आज काँग्रेसमध्ये कोण आहे ? एकहि नाही. औषधालासुद्धा एकहि नाही. तो तेथे राहू शकणार नाही. असे सर्व लोक आज काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांना काँग्रेस सोडणे सध्याच्या श्रेष्ठींनी भाग पाडलें आहे. नागपूरला सहकारी शेतीचा ठराव झाल्यावर पंडित नेहरू व श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकदम जाहीर केलें की, ज्यांना हा ठराव मान्य नसेल त्यांनी काँग्रेस सोडून जावें ! तुम्ही काँग्रेस सोशॅलिस्ट आहांत, बाहेर व्हा. तुम्ही संयुक्त महाराष्ट्रवादी आहांत, काळें करा. तुम्ही सहकारी शेतीला विरोध करतां, निघा येथून ! काँग्रेसमध्ये धर्महीन, चारित्र्यहीन लोक चालतात, सत्तालोभी व स्वार्थी लोक चालतात, गटबाजी करून काँग्रेस चिरफळून टाकणारे लोक चालतात; पण तात्त्विक मतभेद असलेले निःस्पृह लोक तेथे चालत नाहीत; आणि काँग्रेसला तरुण रक्त हवें आहे !
 स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस ही एक संघटना होती, आता तो एक सत्ताधारी राजकीय पक्ष आहे. तेव्हा पूर्वीचें भिन्न विचारसरणींना अनेक रामशास्त्र्यांना सामावून घेण्याचें धोरण आता चालू ठेवणें युक्त नाही, असें कोणी म्हणतील. पण हा युक्तिवाद फोल आहे. ब्रिटनमध्ये जे अनेक पक्ष आहेत त्यांनी रामशास्त्री सन्मानाने संभाळून ठेवण्याचें धोरण ठेवल्यामुळेच ते जिवंत राहिले व त्यांची वाढ झाली. १७५६ सालीं सप्तवार्षिक युद्ध सुरू झालें. त्या वेळीं न्यू कॅसल मुख्य प्रधान होता. थोरला पिट (चॅथम) हा त्याचा
 लो. ९