पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

काँग्रेसच्या सावटाखाली तरुण कर्तृत्व वाढीस लागणें हें अशक्यच होऊन बसले. त्यामुळेच आज 'नेहरूनंतर कोण' अशी गंभीर समस्या निर्माण होऊन बसली आहे.
 कुऱ्हाडीचा एक घाव घालून आपल्या मतांहून भिन्न असलेल्या ज्या विचारप्रणालींचा नेहरू-पटेलांनी नाश केला त्यांची जपणूक करण्यासाठी लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी आटापिटा केला होता. वाटेल ते अपमान सहन केले होते. स्वराज्य पक्षांतील मोतीलाल नेहरू, जयकर, केळकर, मालवीय यांचे वाटेल ते प्रहार महात्माजींनी सोसले, पण त्यांनी काँग्रेसमधून फुटून जाऊं नये म्हणून विश्वप्रयत्न केले. त्यांना सही केलेला कोरा कागद देऊन आपण बाजूला होण्याची तयारीहि दर्शविली. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, वल्लभभाई, विठ्ठलभाई यांच्याविषयीहि त्यांचं तेंच धोरण होतें. नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रांत व जयप्रकाशांनी आपल्या 'समाजवादच कां?' या पुस्तकांत महात्माजींवर वाटेल ती कडक टीका केली आहे, हें सर्वविश्रुतच आहे. पण यांना, सर्व सामर्थ्य हाती असूनहि, हाकलण्याचा विचार महात्माजींच्या मनांतहि आला नाही. उलट त्यांच्याच हातीं काँग्रेसची सूत्रे द्यावी असा त्यांनी आग्रह धरला. नेहरूंच्या नंतर नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावें अशी सूचना त्यांनी केली होती, आणि तात्त्विक कारण देऊन ती सूचना केली होती. भिन्न मतप्रणालीला अवसर दिला पाहिजे, नाहीतर आपली स्थिति साचलेल्या पाण्यासारखी किंवा बंद केलेल्या खोलीप्रमाणे होईल, मग व्यक्तित्व गुदमरून जाईल असे त्यांनी लिहिलें होतें. लोकमान्यांनीहि आपल्या- भोवती माणसें अशींच संभाळली होती. १९१७ सालानंतर महात्माजींशीं त्यांचा तीव्र मतभेद झाला होता, पण यापुढचा नेता हाच आहे असें त्यांनी आपल्या अनुयायांना लेखी कळविलें होतें. या दोन महापुरुषांनी आपल्या विराटरूपाच्या सान्निध्यांत अनेक भिन्न विचारप्रणालींची वाढ सुखाने होऊं दिली, इतकेच नव्हे तर या रोप्यांचे संवर्धन करण्याचेंच धोरण ठेवलें. तसें त्यांनी केलें नसतें तर टिळकांनंतर कोण? महात्माजींच्या नंतर कोण? असे प्रश्न तेव्हाच निर्माण झाले असते. पण आजच्या प्रौढ पिढीच्या लोकांनी महात्माजींच्यानंतर कोण, असा प्रश्न आपल्या स्वप्नांत तरी आला होता