पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १२७

नाही तसा राष्ट्रपतींच्या जागी येण्याजोगाहि कोणी नाही. भावार्थ असा की, काँग्रेसचें कर्तृत्व वृद्ध झालें आहे, पण ती धुरा वाहण्यास. समर्थ असें तरुण कर्तृत्व तेथे येत नाही.

लोकशाहीची विस्मृति

 असें कां व्हावें ? याचें उत्तर असें की, दण्डसत्तेच्या पद्धतीचा आपणांस अवलंब करावयाचा नाही; आणि लोकशाहीच्या उच्च तत्त्वांचा आपणांस विसर पडलेला आहे. सत्ता व धन यांच्या लोभामुळे काँग्रेस धर्महीन झाली, चारित्र्यहीन झाली, एवढेच नव्हे तर लोकशाहीचें मूळ महातत्त्वच ती विसरली. अत्यंत तीव्र अशा मतभेदालाहि अवसर दिला पाहिजे. इतकेंच नव्हे तर सर्व प्रकारच्या प्रामाणिक मतभेदांची मोठ्या सावधगिरीने जोपासना केली पाहिजे, संघटनेतल्या प्रत्येक व्यक्तीच्या विवेकाचा मान श्रेष्ठींनी राखला पाहिजे, हें धोरण लोकशाहीच्या प्रगतीला अत्यंत अवश्य आहे. आपल्याइतकेंच दुसऱ्याचें मत बरोबर असू शकतें हें जाणणें आणि त्याचा आपल्या मताइतकाच आदर करणें हे तत्त्व सत्ताधारी विसरले की, लोकशाहीचा पायाच ढासळून पडतो. प्रत्यक्ष ज्यांना राज्यकारभार करावयाचा आहे त्यांनी तो आपल्या मताप्रमाणेच करावा हे निश्चित. पण आपल्या संघटनेत, आपल्या पक्षांत अत्यंत निःस्पृह रामशास्त्री सन्मानाने ठेवून घेणें अवश्य, हेहि तितकेंच निश्चित आहे. काँग्रेसच्या नेत्यांना हाती सत्ता येतांच या महातत्त्वाची विस्मृति झाली; आणि महात्माजींचा दुःखद अंत झाल्यापासून चारपांच महिन्यांच्या आतच त्यांनी विरोधी मतप्रणालीला काँग्रेसमध्ये वाव द्यावयाचा नाही असें ठरवून त्या वेळच्या समाजवादी लोकांना बाहेर काढलें. काँग्रेस धर्महीन होऊं नये; चारित्र्यहीन होऊं नये, भ्रष्ट होऊं नये हे पंडितजी, राजेन्द्रबाबू, वल्लभभाई यांना मान्य होतें आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ती होऊं लागतांच त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपल्या अनुयायांवर टीका केली; पण तात्त्विक मतभेदाला आपण अवसर दिला पाहिजे, नाहीतर तरुण रक्त काँग्रेसमध्ये राहणार नाही याची जाणीव मात्र या थोर पुढाऱ्यांनी ठेवली नाही, आणि एकजात सर्व भिन्न मतांची हकालपट्टी केली. त्यानंतर