पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६ : लोकसत्तेला दण्डसत्ते चें आव्हान

सत्य आहे. यानंतर आणखी एका इतक्याच मोठ्या गंभीर समस्येचा विचार करून हे प्रकरण संपवावयाचे आहे. राष्ट्रांतलें तरुण रक्त हे राष्ट्राचें मोठें सामर्थ्य आहे. धाडस, साहस, निष्ठा या गुणांनी तरुण रक्त नेहमीच संपन्न असतें. असें हें तरुण रक्त, ही शक्तीची, सामर्थ्याची देवता, काँग्रेसने उभारलेल्या प्रचंड योजनांच्या मागे उत्साहाने उभी आहे काय, हें पाहणें अवश्य आहे. हे सामर्थ्य काँग्रेसच्या मागे उभें नसेल तर आपल्या राष्ट्रीय सामर्थ्यात फार मोठी उणीव आहे. राष्ट्रालाच वार्धक्य, वैक्लव्य आल्याचें तें मोठें लक्षण आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून हा तपास अवश्य केला पाहिजे.
 आज भारतांत एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न चर्चिला जात आहे. 'पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर कोण ?' हा तो प्रश्न होय. आणि या प्रश्नाची चर्चा करतांनाच काँग्रेसश्रेष्ठी- स्वतः पंडितजीसुद्धा- एकमुखाने सांगत आहेत की, काँग्रेसमध्ये तरुण रक्त येत नाही. 'नेहरूंच्या नंतर कोण?' ही समस्या निर्माण झाली ती त्यामुळेच झाली आहे. वास्तविक लोकशाहीचें लक्षणच हें की, त्या समाजव्यवस्थेत कर्त्या पुरुषांची अखंड मालिकाच निर्माण होत राहिली पाहिजे. नव्या दण्डसत्तांनी आपल्या पद्धतीने हा प्रश्न सोडविला आहे. कोटीकोटींच्या त्यांच्या संघटना असतात. त्यांतून तरुण स्त्री- पुरुषांना सर्व प्रकारचें शिक्षण देण्याची अहोरात्र काळजी घेण्यांत येते. त्यांच्यावर जबाबदारीहि टाकली जाते व त्यांना धारेवरहि धरलें जातें. पण राष्ट्रनिष्ठा, मार्क्सचें तस्वज्ञान, सर्व प्रकारचें विज्ञान, नव्या जगाचा इतिहास, मानसशास्त्र, प्रचारतंत्र या सर्वांचें सशास्त्र अध्ययनहि त्यांच्याकडून करून घेतलें जातें; आणि यांतून राष्ट्राला कर्ते तरुण पुरुष सारखे उपलब्ध होत असतात. आपली लोकशाहीवर निष्ठा आहे, आणि त्या व्यवस्थेत तर क्रांतीनंतर सर्व बाजूंनी तरुण कर्तृत्व बहरून यावयास पाहिजे होतें; पण तसे झाले नाही. उलट तरुण रक्त काँग्रेसमध्ये येत नाही असे निराशेचे उद्गार काँग्रेसश्रेष्ठींना काढावे लागतात. अलीकडेच आपले राष्ट्रपति डॉ. राजेन्द्रप्रसाद म्हणाले की, "इतक्या वार्धक्यांत मी या मोठ्या पदावर अजून कां बसून आहे? याचे उत्तर असें की या पदावर येण्याजोगा कोणी तरुण पुढे येत नाही. तसा कोणी येत असेल तर ही जागा आत्ता खाली करण्यास मी तयार आहे." पण पंडितजींच्या जागी येण्याजोगा जसा कोणी