पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १२५

पण कांही निर्णय करण्यापूर्वी पुढील माहिती पाहावी. मध्यप्रदेशांत ५७ इस्पितळांत डॉक्टरच नेमलेले नाहीत. आंध्र प्रदेशांतल्या एका जिल्ह्यांत १२ इस्पितळांत डॉक्टर नाहीत. रिसोर्सेस अँड रिट्रेंचमेंट कमिटीचा पंजाबविषयीचा अहवाल पाहा. शंभर इस्पितळांत तेथे डॉक्टर नाहीत. अनेक इस्पितळांत उपकरणें नाहीत. सरकारी वैद्यकी संस्था म्हणजे राजकारणी कारस्थानाचे अड्डे झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तीन वेळा बदलले गेले. त्यामुळे धोरणे सारखीं बदलतात. आरोग्य खातें हें जातीयता, गटबाजी व भ्रष्टता यांनी सडून गेलें आहे. त्यात बुद्धि व कर्तृत्व यांचा उपयोग नाही. जात, नातें यांनाच सर्वत्र महत्त्व आहे ! (टाइम्स : १६ मे १९५९) अशा स्थितींत माणूस श्रद्धाशून्य, हृदयशून्य झाला तर त्याची निर्भर्त्सना करतांना (ती केली पाहिजे यांत शंका नाही. माणुसकी सोडणें हें केव्हाहि क्षम्य नाही.) आपण खोलवर विचार केला पाहिजे, आणि तसा विचार केला म्हणजे हें ध्यानांत येईल की, आपली सरकारी कारभारपद्धतिच याला जबाबदार आहे. या यंत्रणेत बसल्यावर माणुसकी टिकवून धरणें हें फार अवघड होऊन बसते. माणसांची कार्यक्षमता विकास पावते ती निश्चित जबाबदारीच्या जाणिवेमुळे, कर्तृत्वाचे चीज होईल, गुणांना योग्य स्थान मिळेल या शाश्वतीमुळे आणि प्रमाद घडला तर शिक्षा होईल या भीतीमुळे. आपल्या यंत्रणेत या सर्वांचा अभाव आहे. तेथे माणसाच्या भावना बोथट होतात, वृत्ति बधीर होतात, ईर्षा नष्ट होते, मन निराश होतें आणि तो या यंत्रणेंतला एक खिळा किंवा स्क्रू होऊन बसतो. यंत्रचालकाच्या भूमिकेवर त्याला आरूढ होतांच येत नाही. मग कार्यक्षमता कशी जोपासावी ?

तरुण रक्त

 दण्डसत्तेचे आव्हान स्वीकारण्याचें सामर्थ्य भारताच्या ठायीं आहे काय याचा विचार आपण करीत आहों. आपलें कृषि - उत्पादन, औद्योगिक उत्पादन यांचे हिशेब आपण पाहिले. आपल्या विकास योजनांची फलितें काय आहेत हें सरकारी समित्यांनीच आपल्याला सांगितले; आणि या सर्व राष्ट्रीय प्रपंचाच्या मागे मानवी कर्तृत्व काय दर्जाचे आहे याचाहिं विचार आपण केला. या सर्वांत अत्यंत निराशाजनक स्थिति आहे हें अत्यंत कटु असें