पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

माणसाला नसतो, कारण त्यांत राजकारण असतें. म्हणून शेवटीं तो धान्य भिजतांना दिसत असूनहि स्वस्थ बसतो. माणसें हृदयशून्य होतात तीं यामुळे. जाऊं दे, मरूं दे, मी काय करणार ही वृत्ति प्रत्येक अधिकाऱ्याची बनत जाते. संरक्षणखात्यांत कोटीकोटीचा माल कुजून जातो. आगगाड्यांचे रोज अपघात होतात. इस्पितळांत औषधपाणी, शुश्रूषा न मिळाल्यामुळे रोगी तडफडून मरतात. हे सर्व डोळ्यांदेखत होत असतांना त्याचें कांहीच वाटू नये इतके भारतीय नागरिक मुळांतच हृदयशून्य आहेत ? इतके ते अक्षम, नालायक आहेत? असें खरेंच असेल तर येथे लोकशाही ही श्रेष्ठ संस्कृतिच काय, पण अत्यंत खालच्या पातळीवरची रानटी संस्कृतिहि निर्माण होणे शक्य नाही. पण तसे वाटत नाही. आपली सरकारी कार्यपद्धतिच अशी आहे की, येथे माणसें हृदयशून्य झालींच पाहिजेत, अक्षम ठरलीच पाहिजेत. जबाबदारीचें विभाजन नाही, निश्चिति नाही आणि शिक्षा होईल हें भय नाही. लोभाला मात्र अवसर मोठा. अनेक ठिकाणी तर वरपासून खालपर्यंत अशी सांखळी लागलेली असते की, मधल्या माणसाला पैसे न खाणें शक्यच नसतें. तो प्रामाणिक राहू लागला तर त्याची नोकरी जाईल. अशा स्थितींत माणसाचें काय होणार ?
 गेल्या वर्षी बालिया- अलाहाबाद येथे एक अत्यंत खेदजनक प्रकार घडला आणि असे अनेक ठिकाणी घडत आहेत. सकाळी ८ ला एक मनुष्य जखमी झाला. पण पोलिसांनी संध्याकाळी ६ पर्यंत त्याला इस्पितळांत नेलें नाही. तेथेही साडेसातपर्यंत अधिकाऱ्यांनी त्याला प्रवेश दिला नाही. प्रवेश मिळाल्यावर वीसच मिनिटांनी तो मनुष्य मेला. ही गोष्ट अत्यंत लांछनास्पद, भारतीयांच्या माणुसकीला काळिमा लावणारी अशी झाली यांत शंका नाही. त्या अधिकाऱ्यांचा अलाहाबाद हायकोर्टात न्या. भू. ढवण यांनी कडक शब्दांत निषेध केला तें योग्यच झाले. कोणत्याहि सबबीवर हे केव्हाहि घडतां कामा नये हें खरें; पण या वेळीं पुन्हा वरचाच प्रश्न मनांत येतो. भारतांतला मानव, वैद्यकीय पेशा घेतलेला मानव, इतका हीन, इतका अधम झाला आहे काय ? आणि तो सर्व प्रांतांत सर्व शहरांत ? कारण हल्ली बहुतेक सर्व इस्पितळांची हीच कहाणी आहे. तेथे माणसें नसून कोणी मानवेतर प्राणी, हिंस्र प्राणी असावेत असे वाटण्याइतक्या त्या हकीकती उद्वेगजनक आहेत,