पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचं आव्हान

सत्ता म्हणजे एक आव्हान आहे असे कधी वाटलें नव्हतें. आव्हानाचा अंतिम अर्थ एकच असतो. लष्करी सामर्थ्यात आम्ही तुमची चितपट करू हाच तो अर्थ होय. तेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ लष्करी सामर्थ्य किंवा निदान तुल्यबल तरी लष्करी सामर्थ्य सोव्हिएट रशिया निर्माण करूं शकेल असें पाश्चात्य लोकसत्तांच्या मनांतहि कधी आलें नव्हतें. याचे कारण अगदी उघड होतें. लष्करी सामर्थ्य, युद्धसामर्थ्य याचा अर्थ पूर्वपिक्षा हल्ली फार निराळा होतो. रणांगणांतील शौर्यधैर्य, कांही लष्करी डावपेच, निष्ठावंत सैनिक एवढे मागे रणांगणांतील विजयांना पुरेसें असे. हल्ली तसें नाही. हल्ली लष्करी सामर्थ्य याचा अर्थ फार व्यापक असा झालेला आहे. सध्या युद्धाला पहिली अवश्य गोष्ट म्हणजे तोफा, विमानें, रणगाडे, अणुबाँब, प्रक्षेपणास्त्रे इ. अगदी अद्ययावत् शस्त्रसंभार आणि त्याने समृद्ध अशी यंत्रचलित सेना; पण हा शस्त्रसंभार सिद्ध करावयाचा म्हणजे राष्ट्राचे प्रचंड प्रमाणांत औद्योगीकरण झालेले असणें अवश्य असतें. पोलाद, कोळसा, पेट्रोल, वीज, तांबें, रबर इ. अनंत पदार्थ, नाना रसायनें, नाना उपकरणें व हें सर्व निर्माण करणारी महायंत्र हे औद्योगीकरणावांचून प्राप्त होणें अशक्य आहे. हे अनंत पदार्थ, ही रसायनें विज्ञानावांचून, शास्त्रज्ञानावांचून कशी प्राप्त होणार ? म्हणजे या औद्योगीकरणासाठी रसायन, पदार्थविज्ञान, गणित, भूगोल, खगोल, प्राणिशास्त्र इ. सर्व अर्वाचीन शास्त्रांचें अद्ययावत् ज्ञान असलेले विज्ञानवेत्ते राष्ट्राजवळ असले पाहिजेत. हें विज्ञानबळ सिद्ध व्हायचे तर त्या त्या शास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची उत्कृष्ट व्यवस्था असलेली, कार्यक्षम विद्यापीठें उभारली पाहिजेत. आइन्स्टाइन् किंवा एडवर्ड टेलरसारखा एखादा नामांकित शास्त्रज्ञ शिखरावर यायचा म्हणजे त्याच्या हाताखाली त्या शास्त्राचें ज्ञान असलेले हजारो दुय्यम शास्त्रज्ञ, अध्यापक व विद्यार्थी असणें अवश्य आहे. ते सर्व या विद्यापीठांतून तयार व्हावयाचे असतात. म्हणून विज्ञानाच्या अध्ययनाची उत्तम व्यवस्था युद्धसामर्थ्याला औद्योगीकरणाइतकीच आवश्यक असते. हा झाला प्रत्यक्ष साधनसामग्रीचा विचार पण या साधनसामग्रीमागे सुसंघटित असें अखिल राष्ट्र उभें पाहिजे. अर्वाचीन युद्ध हें सर्वगामी, सर्वव्यापी युद्ध असतें. राष्ट्रीय प्रपंचाचें एकहि अंग त्यांतून सुटू शकत नाही. राष्ट्रांतला प्रत्येक नागरिक स्त्रीपुरुष- बाल, तरुण, वृद्ध, सर्व- हा जणू युद्धांतला सैनिक