पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १११

त्यांतील यश पाहून विस्मित होऊन जातो. त्यामुळेच मग मनांत प्रश्न येतो की, हें कर्तृत्व इतरत्र म्हणजे समाजविकासयोजनांत व राष्ट्रीय उद्योगधंद्यांत कां दिसू नये ? त्याचें उत्तर सोपें आहे. पाऊसपाणी जसें दैवयोगावर अवलंबून आहे तसेंच आपल्या समाजाचे कर्तृत्वहि देवावर अवलंबून आहे. पाऊस यदृच्छेने पडला तर त्या सालीं जशी थोडी सुबत्ता दिसते, त्याचप्रमाणे यदृच्छेने कोठे कार्यक्षमता निर्माण झाली तर त्या क्षेत्रांत यश प्राप्त होतें. कार्यक्षमता निर्माण करण्याचे जे प्रयत्न होणे आवश्यक असतें तशा तऱ्हेचे प्रयत्न येथे होत नाहीत. मनुष्य थोर ध्येयनिष्ठेमुळे, समाजहिताच्या तळमळीमुळे कार्यक्षम होतो. या भावनांचा आपल्या देशांत लोप होत चालला आहे. धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा या निष्ठांतून या भावना निर्माण होत असतात. पण त्यांच्या संस्कारांची व्यवस्था तर इथे नाहीच; तर उलट आपले शास्ते त्याविषयी पूर्ण उदासीन आहेत. पण त्याचा विचार आपणांस पुढे करावयाचा आहे. सध्या आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब घेऊन आपल्या विकासयोजना, आपले राष्ट्रीय उद्योगधंदे तिच्या अभावी कसे अपयशी होत आहेत तें आपण पाहात आहों.

आपले हिशेब !

 कोणत्याहि कार्याच्या योजना आखतांना प्रारंभी कांही हिशेब करावे लागतात, कांही गणित करावें लागतें. आपल्याजवळ भांडवल किती आहे, यां विशिष्ट कार्याला खर्च किती लागेल, साधनसामग्री काय लागेल, ती पुरविणें शक्य होईल की नाही या सर्वांचा विचार करूनच पाऊल टाकावें लागतें. पण आपला एकंदर राष्ट्रीय कारभार पाहिला तर आपल्याला असले हिशेबच करतां येत नाहीत असें दिसून येतें. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व उद्योगपति ए. डी. श्राफ यांनी 'इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स' या संस्थेच्या विद्यमानें झालेल्या भाषणांत हें दाखवून दिलें आहे. त्यांचें म्हणणे असे की, एवढ्या सर्वंकष योजना यशस्वी होण्यासाठी बिनचूक आकडे गोळा करणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता असते. तशी यंत्रणा आपल्याकडे नाही, ही आपल्या योजनांतील मोठी उणीव आहे. यामुळे काय गोंधळ होतो त्याची दोन उदाहरणें श्री. श्राफ यांनी दिली आहेत. द्वितीय पंचवार्षिक