पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

समर्थ नाहीत म्हणून त्यांचे मठ नाहीत व त्यांचे महंतहि नाहीत हे अगदी उघड आहे.
 कार्यक्षमतेसाठी अवश्य गुण कोणते याचा विचार आपण करूं लागलों तर शालेय पुस्तकांतील कंटाळवाणी यादी डोळ्यांसमोर येते. उद्योग, हिशेबीपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, दक्षता, प्रसंगावधान, मनमिळाऊपणा, हेच गुण डोळ्यांपुढे येतात; आणि मौज अशी की, हे सर्वांना माहीत असतात. आर्थिक किंवा राजकीय धोरण कोणतें ठेवावें यासाठी अवश्य जें ज्ञान तें दुर्मिळ असेल, पण कार्यक्षमतेसाठी अवश्य जे गुण त्यांचे ज्ञान दुर्मिळ नाही. त्यांचें आचरण दुर्मिळ आहे, कठीण आहे. मनुष्य किंवा समाज किंवा राष्ट्र लहान किंवा मोठे ठरणें हें या आचरणावर अवलंबून आहे, एरवी हे गुण सामान्यच आहेत.
 आपल्या भारतांतलेंच कार्यक्षमतेचें, अलौकिक कार्यक्षमतेचें एक उदाहरण सांगतों. त्यावरून याचा अर्थ स्पष्ट होईल. तें उदाहरण म्हणजे १९५२ व १९५७ साली भारतांत झालेल्या निवडणुका. हें प्रचंड कार्य अगदी नवीन होतें, त्याचा विस्तार फार मोठा होता, त्यांतील गुंतागुंतीमुळे तें अत्यंत बिकट झालेलें होतें. कोट्यवधि मतदार, लक्षावधि केन्द्रे, त्यांतील कांही जंगलांत, कांही लांबच्या दऱ्याखोऱ्यांत. त्यासाठी लक्षावधि अधिकारी व कामगार तयार करावयाचे, कोट्यवधि मतपत्रिका, पत्रकें छापावयाची. त्यांची चोरी होऊ द्यावयाची नाही. पेट्या तयार करावयाच्या त्या जपून ठेवावयाच्या मतदारांच्या याद्या छापावयाच्या, तत्पूर्वी घरोघरी जाऊन निश्चित माहिती मिळवावयाची, ती तपासावयाची, खोटे मतदार शोधून काढावयाचे, त्यावरून निर्माण होणाऱ्या हजारो तक्रारींचा परामर्श घ्यावयाचा. हें सर्व झाल्यावर पत्रिका, पत्रके, पेट्या इत्यादि सामान व माणसे नेमल्या दिवशीं नेमल्या वेळी, आसामच्या जंगलापासून मलबारच्या समुद्रापर्यंत लक्षावधि केन्द्रांवर पाठवावयाची. नंतर या मतांच्या मोजणीची व्यवस्था ! या व्यापाच्या दर्शनानेच बुद्धीला घेरी येईल. पण हे काम सुकुमार सेन व त्यांचे अधिकारी यांनी इतकें चोख पार पाडलें की, त्याला जगाच्या इतिहासांत तोड नाही, आणि हें जगांतल्या पंडितांनी मान्य केलें आहे. खरोखरच ज्याला या कार्याच्या बिकटपणाची कल्पना आहे तो