पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथं : १०९

सांगितले आहे. त्यामुळे जें काम झाले त्याची निगा राहात नाही. खेडयांतून आता बालोद्यानें केलीं आहेत, बागा रचल्या आहेत, लोकांच्या सभांसाठी इमारती बांधल्या आहेत, झाडे लावली आहेत, ग्रंथालये आहेत, खेळाचें सामान आहे, सर्व आहे. पण मेहता सांगतात की, घेतलेल्या सामानाचा उपयोग केला जात नाही. तें वायां चाललें आहे. पैसा मंजूर केलेला असतो. पण तोहि खर्च होत नाही. कित्येक ठिकाणी शे. ५० रु. पडून आहेत; आणि मग वर्षाअखेरी तो पैसा वाटेल तसा खर्च करण्याची प्रवृत्ति होते. मग तो आकाशांतून कोसळणाऱ्या पाणलोटासारखा येतो आणि जातो. मेहता कमिटीने सांगितलें आहे की, एका विभागांत मार्च महिन्यांत १ लक्ष ७० हजार रुपयांच्या विकास अधिकाऱ्यांनी नुसत्या मुतान्या बांधल्या! कर्जे दिली ती कसलाहि विचार न करतां दिली आहेत. त्यामुळे एका विभागांत १९ लक्षांपैकी फक्त ८ लक्षच वसूल झाले आहेत. खतें, बियाणें शेतकऱ्यांना दिली जातात, पण शेतकरी येईल त्या भावाने तो माल विकून पैसा करतात आणि चैन करतात. कारण उधार दिलेलें परत द्यायचें नसतें अशीच शेतकऱ्यांची प्रामाणिक समजूत आहे. मुसळधार पाऊस कोसळतो त्याची व्यवस्था झाली नाही तर तो वाहून जातो, आणि जातांना अनर्थ करून जातो. तसा हा दिल्लीचा पैसा खेड्यांवर कोसळत आहे, पण तो लोकांची मनें कोरडी करीत चालला आहे. कारण तो इमारतींत साठतो आहे, जिप गाड्यांत साठतो आहे, समारंभांतून वाहत आहे, प्रदर्शनें मांडीत आहे, आरास करीत आहे. पावसाचें पाणी असें कोठे तरी साठले की त्याला दुर्गंधि येते. मग लोक त्याच्याजवळ येत नाहीत. शेतकऱ्याला बीबियाणे, खतें पुरविणें, कर्ज देणे एवढेच आपले काम असें अधिकारी मानतात. त्याच्या मागे राहून त्याला मार्गदर्शन करून उत्पादन वाढविण्याचें अंतिम उद्दिष्ट पार पाडणें हें आपलें कार्य असें मानणारे विकास अधिकारी कोठेच नाहीत. वास्तविक, प्रत्येक विभागांत समर्थांच्या महंतांसारखे काँग्रेसचे दहावीस लोक पाहिजे होते. स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षाहि जास्त कठीण असा हा लढा आहे. येथे तशाच ध्येयनिष्ठ, कार्यक्षम कार्यकर्त्यांची जरुरी आहे. पण स्वातंत्र्यानंतर अशीं ध्येयनिष्ठ माणसे काँग्रेसमध्ये राहू शकली नाहीत. तीं निघून गेली आणि अशीं नवीं माणसें काँग्रेसला मिळत नाहीत. याचें कारण काय ?