पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण : १

सोव्हिएट रशिया व नवचीन
यांनी दिलेल्या आव्हानाचें स्वरूप



 रशियामध्ये दण्डसत्ता स्थापन झाल्याला आता चाळीस वर्षे होऊन गेली. अगदी प्रारंभीं साम्यवादाचा म्हणजेच मानवजातीच्या प्रगतीचा एक नवा प्रयोग म्हणून जग तिच्याकडे कुतूहलाने व बऱ्याचशा औत्सुक्याने पाहात होतें. हा नवा प्रयोग चिरडून टाकण्याचा प्रयत्न प्रारंभी भांडवली राष्ट्रांनी केला होता. तरीसुद्धा त्या संकटाला तोंड देऊन रशियाने मार्गक्रमण केले म्हणून या भांडवली राष्ट्रांतले कर्तबगार लोकहि त्याचें कांहीसें कौतुक करूं लागले होते. पण पुढे लेनिन मृत्यु पावला व स्टॅलिनच्या हाती सत्ता गेली, आणि त्यानंतर या साम्यवादाच्या प्रयोगाला जें ओंगळ स्वरूप येऊ लागलें त्याने जगांतील विचारवंतांची मनें विटून गेली. हा साम्यवादाचा प्रयोग नसून ही एक नवी आसुरी साम्राज्यशाही आहे, झारशाहीपेक्षाहि ती शतपट क्रूर, हिंस्र व हिडीस आहे अशी टीका रशियन शासनावर होऊ लागली. सर्व बाजूंनी त्याची निर्भर्त्सना होऊं लागली. त्याच्यावर निंदेचा भडिमार होऊ लागला आणि हा साम्यवाद म्हणजे जगाची प्रगति नसून हिंस्र, नरभक्षक रानटीपणाचा तो अवतार आहे असें पाश्चात्त्य उदारमतवादी जगाने आपले मत त्याविषयी नमूद करून ठेविलें.

स्पुटनिकपूर्वी
 पण इतके झाले तरी सोव्हिएट रशियांत स्थापित झालेल्या या साम्यवादी सत्तेची पाश्चात्य राष्ट्रांना अजून भीति वाटली नव्हती. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या बलाढ्य राष्ट्रांना आपल्या प्रबल सत्तांना ही साम्यवादी