पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

पाहिजेत. चारित्र्यसंपन्न पाहिजेत. काँग्रेसजवळ अशी ५००० माणसें तर नाहीतच, पण पन्नासहि नाहीत. विकासयोजना का फलदायी होत नाहीत हे पाहावयास लांब जाण्याची आवश्यकता काय आहे ? तेथले नेते, तेथले नियंते कोण आहेत हें पाहिलें की झालें. बलवंतराय मेहता कमिटीने लिहिलें आहे की, हे विकास अधिकारी कामाच्या जागी जिपमधून येतात, ५। १० मिनिटें थांबतात की चालले परत. म्हणून कमिटीने एक उपाय सुचविला आहे की, त्यांच्या जिपगाड्या काढून टाकाव्या. म्हणजे ते आल्यासारखे दोनतीन दिवस राहतील तरी! खरोखर हा किती सोपा उपाय आहे. काँग्रेसच्या अंगीं ध्येयवाद बाणविण्यास किती सोपा उपाय हा. जिप गाड्या काढून टाकाव्या! मेहता कमिटीने अगदी तळमळून इतिवृत्त लिहिलें आहे. कमिटी म्हणते या विकास अधिकाऱ्यांच्या ठायीं केवळ प्रदर्शनवृत्ति आहे. मुंबईचे, दिल्लीचे, युरोप-अमेरिकेचे पाहुणे विकासयोजना पाहण्यास वरचेवर येत असतात. तेव्हा त्यांच्यापुढे प्रदर्शन मांडावें याकडे त्यांचें सारें लक्ष असतें. आणि वर्षभर पाहुणे सारखे येतच असल्यामुळे ही आरास मांडण्यांतच सगळा वेळ जातो. विकासाला वेळच राहात नाही. यामुळे परिणाम काय होतो? बळवंतराय मेहता म्हणतात की, ग्रामीण जनता यामुळे दुरावते. या विकास- योजना आपल्यासाठी आहेत यावर तिचा विश्वास बसत नाही. हे काही सरकारी समारंभ आहेत, आपलें यांत कांही नाही अशीच जनतेची समजूत आहे. -आणखीहि अनेक कारणे आहेत. कांही विभागांत पाटबंधाऱ्यावरचा सगळा पैसा मोठ्या जमीनदारांच्या फायद्याच्या दृष्टीने खर्च केला गेला. त्यामुळे जनता दुरावली. कोठे अधिकाऱ्यांच्या इमारतीवर भरमसाट पैसा ओतला गेला. लोक दुरावले. पाहुणे आले की, समारंभावर अतिशय पैसा खर्च होतो; इतकेंच नव्हे तर जनतेसाठी आणलेलें सामान बहुतेक तेथेच वापरले जाते. मेहता म्हणतात की, इकडे आपण शेतकऱ्याला सांगतो की, मुलीच्या लग्नसमारंभांत जास्त पैसा खर्च करू नये, आणि आपले समारंभ मात्र चालूच असतात. त्यामुळे काय होते ? लोक या योजनेकडे गंमत म्हणून पाहतात ! (रिपोर्ट ऑफ दि टीम फॉर दि स्टडी ऑफ कम्यूनिटी प्रॉजेक्ट्स् ॲन्ड नॅशनल एक्स्टेन्शन सर्व्हिस, नोव्हें. १९५७) लोकांचें योजनांना सहकार्य नाही, ते अजून दूरच आहेत हें तर प्रत्येक मूल्यमापन समितीने