पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

नव्हे तर पंचवार्षिक योजनेंत ते रस घेतच नाहीत." श्री. सी. सुब्रह्मण्यम् म्हणाले की, "आमच्याजवळ ध्येयवादी कार्यकर्ते नाहीत. नागपूर ठरावाप्रमाणे सहकारी शेती घडवून आणण्याचा उत्साह काँग्रेस जनांतच नाही." सर्वांत शेवटी, "या कार्यासाठी सर्वस्व अर्पिण्यास किती लोक तयार आहेत?" असा प्रश्न अध्यक्ष सौ. इंदिराबाई गांधी यांनी विचारला. तेव्हा तीन-चार हातच वर झाले. नवचीन आणि भारत यांची तुलना करतांना श्री. रा. कृ. पाटील यांनी चीनच्या व भारताच्या कार्यक्षमतेंतील या फरकाची कारणमीमांसा दिली आहे. चीनमध्ये एखादी योजना आखली गेली की, ४-५ लाख कार्यकर्ते बाहेर पडतात आणि आधी जनमन वळविण्याचें, लोक- शिक्षणाचे कार्य सुरू करतात. सभा, बैठकी, चर्चा, पत्रके, भाषणे, नभोवाणी या साधनांनी अहोरात्र नव्या कल्पना, नव्या योजना ते लोकांच्या गळीं उतरवितात; आणि अशा रीतीने प्रथम ही महाशक्ति कार्यसिद्धीला अनुकूल करून घेतात. 'टाइम्स ऑफ इंडिया' चे माजी संपादक फ्रँक मोरेस यांनी म्हटले आहे की, 'आखणी झाली की हिंदुस्थान सरकार कायदा करतें, आणि चिनी सरकार चळवळ करतें.' तीच टीका उद्धृत करून श्री. पाटील यांनी चीनच्या यशस्वितेचे रहस्य समजावून दिले आहे, व भारतीय कार्यकर्त्यांच्या निरुत्साहावर टीका केली आहे. एकदोन ठिकाणीं तर, 'सरकारला निकटच्या भविष्यांत कांही करावयाचे आहे की नाही, कां समाजवादी समाजरचना ही एक लोकांना आकर्षित करणारी पण पोकळ शब्दगर्जनाच आहे, अशी शंका येते', असे त्यांनी म्हटले आहे. नियोजन मंडळाच्या कार्यावर डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी हीच टीका केली आहे. ते म्हणतात, 'योजना तयार होऊन प्रसिद्ध झाल्यानंतर नियोजन मंडळ सुप्तावस्थेत गेलें.' या योजनांचे पुढे काय होतें, त्या कार्यवाहीत येतात कीं नाही, त्यासाठी यंत्रणा काय आहे, ती कार्यक्षम आहे की नाही, याकडे मंडळाने लक्ष दिलें नाही.' ढेबरभाईंनी म्हटल्याप्रमाणे, ते आपले कामच नाही, अशी त्यांची वृत्ति असल्यावर दुसरें काय होणार ? चीनचे कार्यकर्ते आखणी होतांच जनतेकडे धाव घेतात, आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फक्त निवडणुकीच्या वेळीं जनतेकडे जातात. काँग्रेसचा जनतासंपर्क नाहीसा होत चालला आहे ही टीका तर खुद्द पंडितजींनीच अनेक वेळा केली आहे. शक्तीची जोपासना