पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १०५.

धनाचा अपहार करणारे गुंड, मवाली है तर दैत्य आहेतच; पण दुर्लक्षामुळे, बेसावधपणामुळे, अज्ञानामुळे, गहाळपणामुळे जे रेल्वेचे अपघात घडू देतात, इमारती पडूं देतात, धान्य कुजूं देतात तेहि दैत्यच होत. दण्डसत्तांकित देशांत सत्ताधाऱ्यांनी हा नियमच केला आहे. स्टॅलिन नेहमी म्हणे, की 'अक्षमता हा गुन्हाच आहे.' अचूक यत्न करणाऱ्या कार्यक्षम लोकांना समर्थ देव म्हणतात आणि चुकणाऱ्यांना अक्षमांना, नालायकांना दैत्य म्हणतात त्यांतला भावार्थ हाच आहे. समर्थांना वन्ही चेतवावयाचा होता, शक्तीची उपासना सांगावयाची होती, राष्ट्रीय प्रपंच यशस्वी करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी धर्माइतकेंच कार्यक्षमतेला महत्त्व दिलेलें आहे. 'सावधू देव जाणावा । उन्मत्तू देत्य बोलिजे ॥ साक्षेपी अंश देवाचे । आळशी वंश दानवी ॥ प्रत्यये बोलता आले । अचूक न चुके जनीं ॥ चुकेना, ठकेना कामी । प्रसंग जाणतां बरा ॥" असा माणूस समर्थांच्या मतें शहाणा होय. "तयाची संगति धरितां सौख्य होताहे ।" लोकांना सुख देणारा तोच देव; आणि "दैत्य ते पीडित लोकां । तदंश जाणिजे तसा ॥" दण्डसत्ता किती कार्यक्षम असते त्याचें वर्णन प्रारंभीच्या प्रकरणांत केलेच आहे. भारतीय लोकसत्ता अशी कार्यक्षमता निर्माण करूं शकेल काय ? हें साधलें नाही तर योजना यशस्वी कशा होणार ? दण्डसत्तेच्या आव्हानाला आपण सहज तोंड देऊ ही आपली प्रतिज्ञा खरी कशी होणार ?
 कोणतेंहि कार्य यशस्वी व्हावयाचें तर त्या कार्याविषयी कर्त्याला फार मोठी तळमळ असणें अवश्य आहे. त्या कार्याचे महत्त्व त्याला इतकें वाटलें पाहिजे की, त्यासाठी त्याने तनमनधन अर्पावें. आपलीं नियोजनें एवढी प्रचंड आहेत, त्यांचा राष्ट्रव्यापी पसारा, त्यांत गुंतलेलें धन, त्यावर अवलंबून असलेलें आपलें भवितव्य यांचीं प्रमाणें मापनें इतकीं अजस्र आहेत की, पहाडी कर्तृत्वाचे, कृतबुद्धीचे, 'देह जावो अथवा राहो' या वृत्तीचे लक्षावधि कार्यकर्ते ती यशस्वी होण्यासाठी अवश्य आहेत. दुर्देव असें की, कॉंग्रेसजवळ हें मानवधन मुळीच नाही. एकदा दिल्लीला अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक झाली त्या वेळी श्री. ढेबरभाई म्हणाले, "कांग्रेस कार्यकर्ते जागा भूषविण्यापलीकडे कांही करीत नाहीत. योजना आखणे एवढेच आपले काम, त्या कार्यवाहींत आणणें हें सरकारचें काम आहे असें त्यांना वाटतें. इतकेंच