पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

बुडवून टाकतो आणि थोडा काळ लोटला की, एवढा पूर येऊनहि डोळयाला लावायलासुद्धा पाणी मिळत नाही ! हे होऊं नये म्हणून या जलराशींतून लक्ष्मी निर्माण करणारा नियंता, समर्थ असा योजक हवा असतो, आणि तोच येथे दुर्लभ आहे.
 तो कां दुर्लभ झाला आहे त्याचीं कांहीं कारणें मागल्या प्रकरणांत सांगतली. १९४७ पूर्वी जो योजक येथे होता तो सध्या सत्तालोभाला बळी पडून त्या खेळांत गुंग आहे. त्याच्या बहुसंख्य अनुयायांना 'राजकारण' झालें आहे; आणि त्यामुळेच स्वार्थ, जातीयता, कूपमंडूक वृत्ति हे रोग बळावले आहेत, आणि या रोगांनीच आमचें चारित्र्य नष्ट झालें आहे. नीति संपुष्टांत आली आहे. धर्माला ग्लानि आली आहे. या रोगांनी आणखी काय अनर्थ केले आहेत तें आता पाहावयाचे आहे.

कार्यक्षमता

 धर्म, नीति, सद्भावना यांच्या इतकीच कार्यक्षमतेची सामर्थ्याच्या उपासनेला आवश्यकता आहे. चारित्र्यहीनतेमुळे ज्याप्रमाणे कोटी कोटी धनाची हानि होते त्याचप्रमाणें अक्षमतेमुळेहि होते हे आपण जाणलें पाहिजे. दामोदर व्हॅलीचे मुख्य इंजिनियर यांना कोनार हे १० कोटींचें धरण बांधण्याची जरूर नव्हती हें तें धरण बांधल्यावर कळलें. ते सावध, साक्षेपी, जाणते असते- तसे ते आहेत असें धरूनच त्यांची सरकारने एवढ्या मोठ्या जागी स्थापना केली होती- तर हे १० कोटी रु. पाण्यांत गेले नसते. आपल्या देशांत धरणें अशीं व्यर्थ बांधली जातात, इमारती पुऱ्या होण्याच्या आतच त्यांना तडे जातात, रेल्वेचे अपघात ही नित्याचीच गोष्ट होऊन बसली आहे. मनुष्य नोकरीतून निवृत्त झाल्यावर चार चार वर्षे त्याला त्याचें पेन्शन मिळत नाही, हीं कशाचीं लक्षणें आहेत ? नालायकी, गहाळपणा, बेजबाबदार वृत्ति याचे हे सर्व परिणाम आहेत. यामुळे दर क्षणाला राष्ट्रीय सामर्थ्यं खच्ची होत आहे हें ध्यानी घेऊनच समर्थांनी कार्यक्षमता, साक्षेप, सावधता या गुणांना धर्म, नीति, चारित्र्य यांच्या बरोबरीचें स्थान दिलेलें आहे. ते म्हणतात, "अचूक यत्न तो देवो । चुकणें दैत्य जाणिजे." जे इंजिनिअर इमारत कच्ची बांधतात ते दैत्य होत. हिंसा करणारे, बलात्कार करणारे,