पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १०३

करण्याची व्यवस्था केली आहे, चोर-दरोडेखोरांच्या प्रतिकाराची व्यवस्था केली आहे. अशी वर्णने मधूनमधून वाचावयास मिळतात आणि अधिक शोध केला तर लगेच कळून येतें की, या सर्व नवसृष्टीच्या मागे त्या गावांतले कोणीतरी एकदोन कर्तेपुरुष- चारित्र्य संपन्न पुरुष- उभे आहेत. ते म्हणजे त्या गांवाचा आत्मा असतो. त्यामुळे त्या देहांत नवचैतन्य निर्माण झालेलें असतें आणि त्या चैतन्यामुळे सर्व कायापालट झालेला असतो. पण अशा वार्ता मधून मधून येतात. योजनांत समाविष्ट झाली आहेत तीं भारताचीं खेडीं पांच लक्ष आहेत. त्यांतल्या कांही खेड्यांतून, हजारांतून एखाद्या खेड्यांतून अशा वार्ता येतात. आपल्याला कायापालट करावयाचा आहे, तो सर्व भारताचा. पांच लक्ष खेड्यांचा आणि हजारो नगरींचा ! तेथे असें यश कां येत नाही ?

योजकस्तत्र दुर्लभः

 भारताच्या योजनांचीं वर्णने वाचलीं म्हणजे मनांत येतें की, आकाशांतून कोसळणाच्या मुसळधार पावसासारखी किंवा सागराच्या प्रचंड लाटांसारखी ही शक्ति आहे. सागराच्या लाटा ही प्रचंड शक्ति आहे, पण मानवाला तिचा उपयोग शून्य आहे. कारण तो अजून आपल्याला यंत्रबद्ध करतां आलेली नाही. ती पट्ट्यावर घेतां आलेली नाही. तशी ती आली तर एका क्षणांत या विश्वाचें रूप ती पालटून टाकील. तेंच आपल्या ग्रामीण शक्तीचें आहे. योजनांचा जो पसारा आपण मांडला आहे यामुळे सर्व भारत हलून गेला आहे. ही शक्ति जागृत झालेली आहे; पण ती नियंत्रित करण्याचें, संघटित करण्याचे चातुर्य, त्यासाठी लागणारें चारित्र्य येथे कोणाजवळ नाही. आकाशांतून पाणलोट कोसळावे तसा वर सांगितलेला साधनसंभार- यंत्रें, खतें, बियाणे, तगाई, कर्ज, माणसें- दिल्लीहून आपल्या खेड्यावर कोसळत आहे. पण तो पाणलोट अडवून धरून बंदिस्त जागी साठवून, हुकमतींत ठेवून योग्य त्या ठिकाणीं त्याचा विनियोग करता आला नाही तर त्याचें काय होतें तें आपण पाहातच आहों. आज हजारो वर्षे पाहात आहों. हा अनंत जलराशी पडतो तसाच वाहून जातो आणि जातांना जमीन धुपून नेतो, झाडे उन्मळून टाकतो. महापुराने जीवन उद्ध्वस्त करून टाकतो. उभी शेती