पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

विज्ञानाची प्रगतिसुद्धा कोपरनिकस, गॅलिलिओ, डार्विन, मेरी क्युरी या शास्त्रज्ञांच्या ठायीं सत्त्व नसतें, चारित्र्य नसतें तर झाली नसती. मग लोकशाही समाजवाद या क्षेत्रांत सत्त्वाची किती आवश्यकता असेल याची सहज कल्पना करतां येईल. १९४७ पूर्वी, कवीने ज्यांना उपकरणें म्हटलें आहे, तशीं उपकरणें, म्हणजे साधनसंभार आपल्याजवळ फारसा नव्हता; पण तेव्हा सत्त्व होतें. तेव्हा टिळक होते. महात्माजी होते. आता पूर्वीच्या मानाने साधनसंभार पुष्कळच लाभला आहे. पैसा आहे, अधिकार आहेत, सरकारी यंत्रणा आपलीच आहे, हजारो पगारी माणसें आहेत, वृत्तपत्रे, नभोवाणी यांसारखी प्रचारसाधने आहेत. नद्यांचें पाणी अडवलेलें आहे, यंत्रांत वीज तयार आहे, खतांचे उत्पादन होत आहे, परदेशचे स्थापत्याचे, शेतकीचे, कारभाराचे तज्ज्ञ येत आहेत, आपले तरुण शिकून तयार झालेले आहेत. तुलनेने पाहिलें तर साधनसंभार खूपच वाढला आहे, पण भारतांतलें सत्त्व नष्ट होत चालले आहे.
 आपल्या समाजविकासयोजना, राष्ट्रविकासयोजना इ. योजनांनी भारताच्या सर्व खेड्यापाड्यांत नवजीवनाची हाक निश्चित पोचली आहे; आणि सर्व समाज, सर्व ग्रामीण जनता कांही नव्या औत्सुक्याने सभोवार पाहू लागली आहे. युगानुयुगे सुस्त पडलेल्या या राष्ट्रपुरुषाच्या देहांत मोठेच चलनवलन दिसूं लागलें आहे. त्याच्या सर्व अवयवांत, अंगप्रत्यंगांत या योजनांमुळे नवी थरारी गोचर होऊं लागली आहे. दिल्लीला राज्य कोण करतें आहे, तो राजा स्वकीय आहे की परकीय आहे, तो आपल्यासाठी काय करतो आहे, तो आपल्याला काय सांगतो आहे, याची दखल आपण घेतली पाहिजे अशी एक नवी प्रबुद्धता सर्व भारतांत निर्माण झालो आहे. काही काही वृत्तपत्रांतून कांही खेड्यांनी कांही ग्रामसंघटनांनी आपल्या सर्व खेड्याचा कायापालट करून टाकल्याचे जे वृत्तान्त येतात ते वाचून आपल्या योजनांची आखणी नी मांडणी किती योग्य आहे त्याची साक्ष पटते. त्या गावांत ग्रामजनांनी रस्ते केले आहेत, शाळा बांधल्या आहेत, मंदिर उभारले आहे, पार बांधले आहेत, जवळून वाहणाऱ्या ओढयाचे पाणी अडविलें आहे, विहिरी खोदल्या आहेत, पेढी उघडली आहे, सरकारच्या साह्याने बी-बियाणे, खतें, नवीं अवजारें मिळविली आहेत, पिकांचें रक्षणं