पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

जगांतल्या कोणत्याहि सुलतानापेक्षा ती सत्ता जास्त होती, आणि ती शुद्ध लोकशाही मार्गाने आलेली असल्याने तिच्या शतपटीने जास्त प्रभावी होती. उत्कर्षपथावर पावले टाकणाऱ्या भारताला जें जें म्हणून पाथेय अवश्य होतें तें तें सर्व त्यांच्याजवळ होतें.

सर्वत्र अपयश

 पण असे असूनहि आज दहा वर्षांनंतर दण्डसत्तांचे आव्हान आपल्याला स्वीकारतां येईल काय असा प्रश्न विचारल्यास त्याचें उत्तर देण्याचें धाडस होत नाही. उत्तरच देऊं नये असें वाटतें. कारण यशःसिद्धीचीं सर्व साधनें असूनहि आपल्याला कोणत्याहि क्षेत्रांत यश म्हणून येत नाही. प्रत्येक क्षेत्रांत आपले पाऊल मागेच पडत आहे. अलीकडे सरकारनेच जाहीर केलें की, १९५७-५८ या वर्षी आपले राष्ट्रीय उत्पन्न १७० कोटी रुपये कमी झालें. ११००० कोटींवरून ते १०८३० कोटींवर आलें. कारण काय, तर या वर्षी एकंदर शेतमालाचें उत्पन्न ३२० कोटींनी कमी झाले. याचा अर्थ असा की, आपले सर्व जीवन अजून मान्सूनच्या मर्जीवर अवलंबून आहे. बारा वर्षांत माणसांच्या हाती कसलीहि सत्ता आलेली नाही. गेल्या सहा वर्षांचा हिशेब पाहतां राष्ट्रीय उत्पन्नांत वाढ झाली आहे हें खरें; पण तिचें स्वरूप पाहिलें म्हणजे हेंच दिसतें. येथे योगायोगाने कांही तरी घडत आहे; आपण घडवीत आहों असें दिसत नाही. एक साली वाढ शे. ६ तर दुसऱ्या सालीं शे. १. एकोणीसशे सत्तावन साली शे. ५ वाढ तर अठ्ठावन साली उणे एक. सगळी मिळून सरासरी शे. २.५ वाढ अशी दिसते, पण एकतर जेथे नियोजन नाही तेथेहि इतकी वाढ होतेच; आणि दुसरें म्हणजे या मानाने लोकसंख्या थोडी जास्तच वाढली आहे. म्हणजे ही वाढ खरी वाढच नव्हे असा हिशेब होतो. (टाइम्स: २७ जुलै १९५९). हा झाला गेल्या तीन चार वर्षांचा हिशेब. त्याच्या आधीच्या पांच वर्षात (१९५१ ते ५६) राष्ट्रीय उत्पन्नांत शेकडा १७.५ ने वाढ झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेंत आपल्याला चांगलें यश मिळाले असे सर्वांचेंच मत आहे, पण तें सांगून तज्ज्ञ पुढे लगेच म्हणतात की, पहिली तीन वर्षे पाऊसपाणी उत्तम होतें म्हणून वाढ झाली. पुढल्या दोन वर्षांत वाढ अगदीच अल्प झाली. म्हणजे गेल्या बारा वर्षांत पुरुषार्थ असा कांहीच झाला नाही. मागे घडत होतें तेंच आता घडत आहे.