पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथे : ९७

 मागले प्रकरण लिहिले तेव्हा मनावर फारच खिन्नता पसरलेली होती; आणि तें वाचतांना वाचकहि अस्वस्थ झाले असतील यांत शंका नाही. या देशावर अशी अवकळा येण्याचें वास्तविक कांहीच कारण नव्हतें. टिळक, महात्माजी, पंडित जवाहरलालजी यांसारखे हिमालयोत्तुंग पुरुष नेते म्हणून, कर्णधार म्हणून, आपल्याला लाभले होते. ब्रिटिशांसारख्या अत्यंत समर्थ जातीशी सामना देऊन, त्या बलाढ्य सत्तेवर मात करून, आपण स्वातंत्र्य प्राप्त करून घेतलें होतें. देशांतली, प्रत्येक प्रांतांतली जनता प्रबुद्ध झाली होती. अमेरिकेसारखें अत्यंत संपन्न व बलशाली राष्ट्र आशिया खंडांतल्या या नवोदित लोकसत्तेला वाटेल तें साह्य करावयाचें, त्यावरच जगांतल्या लोकसत्तेचें भवितव्य अवलंबून असल्यामुळे वाटेल ती किंमत देऊन या रोपाची जपणूक करावयाची, अशा कृतनिश्चयाने पावले टाकीत होतें. आशिया खंडांतल्या लहान मोठ्या राष्ट्रांना तर महात्मा गांधी व पंडितजी म्हणजे देवदूत वाटत होते. उत्कर्ष सोपानावर चढणाऱ्या राष्ट्राला यश:- सिद्धीची ग्वाही देण्यास यापेक्षा आणखी काय हवें असतें ?
 लोकशाहीच्या मार्गाने उत्कर्ष साधावयाचा तर देशांत अत्यंत प्रबळ अशी ऐक्यभावना पाहिजे, आणि तिचें प्रत्यंतर म्हणजे जनतेने प्रचंड बहुमताने एका पक्षाच्या हाती सत्ता दिली पाहिजे. १९५२ साली निवडणुका झाल्या त्या वेळी नेत्यांना अवश्य असलेली ही महाशक्ति जनतेने अविचलित श्रद्धेने त्यांच्या हाती दिली, आणि 'या भूमींत नवी सृष्टि निर्माण करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहों, म्हणाल तो त्याग करावयास, सांगाल ते कष्ट उपसावयास, कोणत्याहि हालअपेष्टा सोसावयास आम्ही सिद्ध आहों' असें प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलें. खरोखर त्या वेळीं कांग्रेसच्या हाती एवढे सामर्थ्य आलें होतें, इतकी कर्तुमकर्तुम् शक्ति एकवटली होती, की जगांतल्या कोणत्याहि देशांतल्या कोणत्याहि पक्षाच्या हातीं पूर्वकाळीं तशी आली नसेल. लोकसभा, विधानसभा यांतून काँग्रेसला प्रचंड बहुमत तर मिळालें होतेंच, पण त्याहिपेक्षा खरें सामर्थ्य म्हणजे पंडितजींवरची लोकांची अतुल भक्ति ! आधींच्या पंचवीस वर्षांतलें पंडितजींचें कर्तृत्वच तसें होतें. धैर्य, त्याग, कार्यक्षमता, विशाल दृष्टि, तळमळ, आत्मविश्वास,- नेतृत्वास अवश्य असलेला प्रत्येक गुण त्यांच्या ठायीं प्रकर्षाने वास करीत होता. अशा या पुरुषाच्या हाती पसतीस कोटी लोकांनी भक्तिभावाने दिलेली ती सत्ता !
 लो. ७