पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ९५

दण्डसत्तांचे आव्हान आपल्याला स्वीकारतां येईल काय याचा विचार करतांना त्या दण्डसत्तांनी ज्या नवशक्तींची उपासना केली त्या वश करून घेणें हा एकच उपाय आहे हें ध्यानांत ठेवून त्या दृष्टीने त्यांनी हिशेब करावा. लष्करी सामर्थ्य, औद्योगीकरण, विज्ञानोपासना, संघटित समाज आणि कर्तृत्वशाली व कार्यक्षम पुरुष हे षडंगबल आपल्याजवळ सिद्ध आहे काय हे प्रथम पाहावें. या प्रकरणांत आपण तोच हिशेब घेत आहों. ऐक्य, संघटना, समाजहितबुद्धि या दृष्टीने या प्रकरणांत आपण पाहणी केली. धर्म, चारित्र्य, ध्येयवाद यांचा दिवसेंदिवस शून्याकार होत चालल्यामुळे आपला समाज शतधा भंगला आहे, छिन्नभिन्न झाला आहे आणि म्हणून अन्नधान्य, महागाई, बेकारी या सर्व युद्ध-आघाड्यांवर त्याला यशःप्राप्ति होत नाही असें आपल्याला दिसून आलें. इतर क्षेत्रांतल्या बलाबलांचा विचार यापुढे केला पाहिजे. तो पुढील प्रकरणांत करू.

+ + +