पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

त्यांना सहज दिसून येईल, कारण तेथे कोणताहि प्रश्न सोडविण्यांत त्यांना यश आलेले नाही, आणि स्वार्थ, सत्ता, लोभ, राजकीय गुंडगिरी, जातीय दृष्टि हींच याची कारणें आहेत.
 केंद्र सरकारने न्यायखात्याच्या कारभाराचें परीक्षण करण्यासाठी लॉ कमिशन नेमलें होतें. त्या कमिशनवर ॲटर्नी जनरल, हायकोर्टाचे माजी यायमूर्ति असे मोठे अधिकारी होते. त्यांनी आपले मत दिलें की, न्यायखात्यांत वरच्या जागांवर नेमणुका करतांना गुण, कर्तृत्व, यांपेक्षा इतर गोष्टींचा विचार जास्त केला जातो. भारताच्या सर्वश्रेष्ठ न्यायाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे. सर्वश्रेष्ठ सत्ताधीश व कारभारी यांच्या लेखींहि गुण व कर्तृत्व यांना किंमत नसेल तर भारतीयांच्या अंगच्या गुणांनी व कर्तृत्वाने जावें तरी कोठे ? कोणाचा आश्रय करावा ? तें कर्तृत्व सध्या अगदी अनाथ होऊन वनवासी झाले असलें, क्षीण होत चालले असले तरी त्याला जबाबदार कोण ? आणि कर्तृत्वाचीच जोपासना करणान्या दण्डसत्तांपुढे त्याच्या अभावी आपला टिकाव लागेल काय?

भारताची मानहानि

 रशिया व चीन यांच्या सामर्थ्याचा विचार करतांना पहिल्या प्रकरणांत असें सांगितलें आहे की, त्यांनी नव्या मूल्यांची उपासना केली नसली तरी नव्या शक्तींची उपासना निश्चित केली आहे. त्या शक्तींना आपल्याला तोंड देतां येईल काय असा आपल्यापुढे प्रश्न आहे. त्या शक्ति आक्रमक, युद्धवादी व साम्राज्यवादी आहेत व संधि मिळतांच कोठेहि झडप घालायला कमी करणार नाहीत हे हंगेरी, तिबेट यांच्या कहाणीवरून स्पष्ट झालें आहे. त्यामुळे भारतानेहि अहोरात्र सन्नद्ध, सज्ज राहिलें पाहिजे हें अगदी निर्विवाद आहे. तसे आपण सज्ज आहोंत का, तसें सन्नद्ध, सज्ज राहण्याची ताकद आपल्याला आहे काय याचा आपण विचार करीत आहों. लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने आपली काय स्थिति आहे याचा प्रत्यय पाकिस्तान दरघडीला आणून देत आहे. आपला प्रदेश तो आक्रमीत आहे, स्त्रिया पळवून नेत आहे, सरहद्दीवरच्या लोकांना ठार करीत आहे, शेतीचा विध्वंस करीत आहे आणि सर्व प्रकारें भारताची मानहानि करीत आहे. आपल्याला