पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग २ राच पडतो. कारण राजद्रोहाचा खटला होणे ही गोष्ट काही नुसत्या परिश्रमाला कारण नसते. तर त्यात शरिराने पैशाने व मनाने कष्ट सोसावे लागतात व हानि होते. हे कष्ट ही हानि एकच मनुष्य वरचेवर कसा किती सोशील ? १८९७ च्या खटल्यामुळे टिळकांच्या प्रकृतीवर फार परिणाम झाला. तुरुंगातून ते जिवंत बाहेर येत नाहीत असेच पहाणारास वाटे. १९०८ च्या खटल्यात शिक्षा प्रत्यक्ष काळे पाण्याची झाली. पुढे ती साधी करण्यात येऊन टिळकाना चांगले वागविण्यात आले हे वेगळे. पण तिसरा खटला होऊन शिक्षा झाली तर अशी सवलतहि कदाचित् मिळणार नाही ! टिळकाना राजद्रोहाची संवय लागली. त्याना ते एक व्यसनच जडले ! तेव्हा अशा मनुष्याला दया कोठवर दाखवावी ? जातील तुरुं- गात मरून तर जातील असेहि सरकारला का न वाटावे ? १८९७ च्या खटल्या- च्या वेळी प्रथम टिळकाना कर्ज काढावे लागले. मागाहून एक मोठा फंड जमला व बाहेरचे बारिस्टर काम चालवायला आले ! १९०८ च्या खटल्यात टिळकानी स्वतः खटला चालविण्याचे खरे एक कारण बॅरिस्टर देण्याइतका पैसा त्यांच्या- जवळ नव्हता आणि खटल्याला स्वरूप भयंकर आल्याने जाहीर फंड उभार- ण्याची सोय नव्हती ! दुसरीहि कारणे होती पण पैशाची वाण हे एक मुख्य होते हे अंतः स्थिति माहीत असणाराना ठाऊक आहे. १८९७ च्या खटल्याच्या वेळी टिळक तरुण उमेदीच्या वयात होते. १९०८ साली त्यांची पन्नाशी उलटून गेली असून उतारवयाचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसहि लागले होते. आणि मंडाले- हून परत आल्यावर त्यांची गणना वृद्धांत झाली. ' गीताभाष्य लिहिलेत कुटुं- हि पूर्वीच वारले आता संन्यास व्याना' असे काही संन्यासमार्गी स्नेह्यानी त्यांना खरोखर म्हटले देखील ! तात्पर्य नवे संकट सोसण्याची टिळकांची यावेळी फारशी पात्रता नव्हती. अशा सर्व गोष्टी प्रतिकूळ असता व जुन्या दोन खटल्यांचे अनुभव चांगले आठवणीत असता दुसऱ्या खटल्याच्या शिक्षेतून सुटून आल्यावर अवघ्या एक- दीड वर्षातच त्यानी पुनः सरकारला एका नव्या खटल्याची तयारी करून दिली ही गोष्ट आश्चर्यकारक नव्हे काय ? पण टिळकांची लोकोत्तरता ती हीच. पुनः खटला होण्याचा संभवच नाही अशी त्याना कोणी खात्री पटविली होती ? आणि पुनः शिक्षा झाली तर जुन्या सवलती मिळतील किंवा आपले शरीर ती शिक्षा निभा- वून नेईल असे टिळकांना खरोखर वाटण्यासारखे नव्हते. पण 'प्रकृतिस्त्वां नियो- क्ष्यति ' हे गीतावचन टिळकांच्या विषयी या कामी निर्णयात्मक ठरले. परिणाम माहीत असले तरी कर्तव्य करण्याला भ्यावयाचे नाही हाच टिळकांच्या प्रकृतीचा धर्म. यामुळे संधि सांपडताच त्यानी पुनः राजकीय लोकशिक्षणाला सुरवात केली आणि संधि सांपडताच पुनः सरकाराने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. पण पूर्वीच्या दोन खटल्यापेक्षा या वेळी एकंदरीने स्थिति थोडी निराळी आणि किंचित अनुकूल आहे असे टिळकानी खटला भरला गेल्यावर तर ताडलेच,