पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ वाढदिवसाचा समारंभ २१ नंतर ना. दाजीसाहेब खरे म्हणाले की ज्या टिळकांचा यशोदुंदुभी सर्व हिंदुस्थानभर गाजतो आहे. त्यांचा छळ होणे अटकाव होणे साहजिक आहे. युरोपातील चळवळीचा इतिहास हेच सांगतो. टिळकांचा उद्योग व त्यांचे धैर्य पाहून कौतुक वाटते व ते माझे परमस्नेही म्हणून तर विशेषच आनंद होतो. दादासाहेब करंदीकर यानी भाषण करताना, सुख व दुःख ही बळवंत- रावानी समान मानलेली आहेत त्यांचे आचरण गीतारहस्याला धरूनच आहे असे सांगितले. काशिनाथ शास्त्री लेले म्हणाले की आम्ही वैदिक लोक अशी प्रार्थना करणार की आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यापैकी निदान एकेक दिवस घेऊन तो ईश्वराने टिळकाना द्यावा. गंगाधरराव देशपांडे म्हणाले की टिळक अमर नसले तरी टिळकवृत्ती टिळकतत्त्व ही अजरामर आहेत. संकटाना न जुमानता शक्तिसर्वस्व खर्चून कार्य करणे याचेच नाव टिळकतत्त्व. अशीच इतर अनेक भाषणे झाल्यावर व्यक्तिशः अनेक लोकानी आपल्या आवडीच्या लहानसान वस्तू टिळकाना नजर केल्या. नंतर केळकर यानी असे जाहीर केले की "आहेराचा आकडा या क्षणाला ८५ हजारावर गेला आहे व काही रकमा आज वाट चालत असून उद्या सकाळी हाती येतील. शिवाय त्यातूनहि किरकोळ काही कमी पडले तर ते पुरे झालेच म्हणून समजा असे बसलेल्या मंडळीपैकी दहा पाचानी सांगून टाकले आहे. आणि अशा रीतीने संकल्पाप्रमाणे एक लक्ष रुपयाचा अहेर जमला असे प्रसिद्ध करण्याला चालकानी मला आज्ञा दिली आहे. " शेवटी टिळकांनी सद्गदित अंतःकरणाने सर्वाचे आभार मानले. ते म्हणाले, " माझ्या ६१ व्या वाढदिवसा- निमित्त आपण मला जे मानपत्र दिले व आहेर केला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे असे म्हटले तर माझा आशय व्यक्त करण्यास ते शब्द फार अपुरे आहेत हे मी जाणतो. पण आनंदादि विकारांची भाषा नेहमीच उद्गाररूपी म्हणजे अत्यल्प शब्दानी व्यक्त होणारी असते हे लक्षात बाळगून वरील उद्गारात जो काही अपुरेपणा आहे तो आपण आपल्या थोर मनाने पुरा करून घ्यावा अशी माझी आपणास अंतःकरणपूर्वक विनंति आहे. आणि मला अशी खात्री आहे की आहेर थोडा थोडा म्हणताहि तो जसा अनेक हजार रकमेपर्यंत गेला त्याचप्रमाणे माझे आभारप्रदर्शक थोडे उद्गारहि आपण उदार अंतःकरणाने वाढवून घ्याल. आजपर्यंत मला आपले अनेक प्रकारे साहाय्य झालेले आहे व त्याचा उतराई मी कसा व्हावे या चिंतेत असताच माझ्यावर उपकारांचे आज हे दुसरे ओझे आपण लादले आहे. जणु काय आपल्या ऋणातून मी कधीच सुटू नये अशी आपली इच्छा आहे ! ही इच्छा लोभाची प्रेमाची व कळकळीची आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही. पण ओझे प्रेमाचे असले म्हणजे ते काही हलके होते असे नाही. म्हणून ते ओझे उचलून आपल्या उपकारातून मुक्त होण्यास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला परमेश्वर शक्ती देवो एवढेच त्याच्यापाशी मागणे आहे.