पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र भाग २ लोकांनाहि विषाद वाटला. प्रेसअॅक्ट मंजूर करून घेताना त्याचा उपयोग केवळ अत्याचारप्रवर्तक वर्तमानपत्रांवरच केला जाईल, असे वचन देण्यात आले होते त्याचा भंग झाला अशी हाकाटी सुरू झाली. श्रीनिवास शास्त्री यानी बेळगांवास व्याख्यान दिले त्यात त्यानी समेटाचे अभिनंदन केले व सागितले की, होमरूल- च्या पुरस्कर्त्यांची काही काही विधाने आह्माला मान्य नसली तरी, स्वतः काँग्रेस जोपर्यंत आपल्या अजगरीवृत्तीचा त्याग करणार नाही तोंपर्यंत या चळवळीला नाव ठेवता येणार नाही. आणि या चळवळीतील दोष वर्ज्य करून गुण तेवढे घेऊन त्या मार्गाने चळवळ करण्याला राष्ट्रीय सभेला कोणी मना केले नाही. ता. १ जुलै रोजी पुणे येथे मोठी जाहीरसभा भरून प्रेस अॅक्ट रद्द करण्याविषयी मागणी करण्यात आली. प्रेस अॅक्टाबरोबर इंडियन कन्सॉलिडेशन अमेंडमेंट बिल नावाचा एक खोडकर कायदा पुढे आला होता त्याचाहि निषेध करण्यात आला. सभेचे अध्यक्ष ना. कामत हे असून सभेत ना. परांजपे प्रो. लिमये भोपटकर शिवरामपंत परांजपे वगैरे सरमिसळ लोकांची भाषणे झाली. मुंबई- सहि अशा प्रकारची सभा सर दिनशा पेटीट यांचे अध्यक्षतेखाली झाली. पण सरकार एवढ्यावरच थांबले नाही. युद्धामुळे सरकाराला तातडीचे उपाय योजण्याचे विशेष अधिकार देण्यात आले होते त्यांचा उपयोग सरकार अधिकाधिक करू लागले. 'न्यू इंडिया' पत्राचा जामीन घेतल्यावर बाईना मुंबई प्रांतात येण्याची मनाई करण्याचा हुकूम सुटला! आणि होमरूलच्या चळवळीमुळे अनेक प्रांतातील पुढारी एकमेकाना भेटी परत भेटी देऊ लागले याचा विषाद वाटून नव्या अधिकाराखाली त्याना प्रथम आपापल्या प्रांतात, मग आपापल्या गावी डांबून ठेवण्याचे धोरण सरकाराने स्वीकारले. याला उद्देशून टिळकांनी केसरीत लिहिले की, सरकारी हुकूम आम्ही पाळू किंवा न पाळू. पण तो शहाणपणाचा आहे की नाही याचा सर्व हिंदी जनतेने विचार करावयास पाहिजे. कर्मेंद्रिये हा हुकूम कदाचित पाळोत पण ज्ञानेंद्रिये त्याविरुद्ध आतून तक्रार करणारच. शांतता राखण्याकरता म्हणून हे उपाय योजण्यात येतात. पण सरकारला हे कळावे की युद्धाच्या दृष्टीने अहितकारक असे या चळवळीत काही नाही. युद्ध समाप्त झाल्या- वर स्थिरस्थावर होताना घडामोडी होतील त्यात हिंदुस्थानने स्वतः करिता काय मागणी करावी इतकाच या चळवळीचा उद्देश आहे. आणि अशी मागणी कर- ण्याची आकांक्षा अशा उपायाने दडपून टाकू अशी जर सरकारची समजूत असेल तर ती मात्र खोटी आहे हे सरकारने ध्यानात ठेवावे. कर्मधर्मसंयोगाने याच वेळी आयर्लंडातहि होमरूलची चळवळ फिरून सुरू झाली होती. त्याच्या ध्वनीचे आघातहि इकडे उमटत होते. नाइंटिंथ सेंचरी मासिक पुस्तकात मद्रासचे बिशप व्हाईट हेड यानीहि एक लेख लिहून सरकाराला दोष दिला. त्यानी लिहिले की पूर्वी रशिया व जपानचे युद्ध झाले त्याचा संबंध हिंदुस्थानशी अर्थाअर्थी नसताहि त्याचा परिणाम जर हिंदी लोकाच्या आकांक्षेवर झाल्याचे आपण पाहिले, तर ज्या