पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भाग योग झाला आहे. व तो निदान या पुस्तकात तरी टळावा अशी आम्ही सावध- गिरी ठेवली आहे. मान्यतादर्शक विशेषण हे आडनाव झाले की संपले ! कोणाहि मोठ्या माणसाचे मोठेपण देशभक्ताची देशभक्ति ही त्याच्या कृतीच्या व चारित्र्याच्या वर्णनावरूनच लोकाना खरी अनुमानिता येऊ शकते. तेच खरे मोठेपण व तीच खरी देशभक्ति टिळकांच्या लोकमान्यतेचीहि गोष्ट अशीच आहे. या ग्रंथात टिळकांचे विचार व आचरण यांचे जे वर्णन हकीकतच्या रूपाने आम्ही दिले आहे त्यावरूनच त्यांची खरी लोकमान्यता बाचकाना उमगणारी व पटणारी आहे. पण कित्येक वेळा मित्रापेक्षा शत्रूच एखाद्याच्या गुणवर्णनाला अधिक उपयोगी पडतात. आणि गुणलुब्ध हिंदी जनतेने टिळकाना 'लोकमान्य' ही जी पदवी अर्पण केली तिचे प्रत्यंतर टिळकांचे शत्रू व्हॅलेंटाइन चिरोल यानीहि दिले आहे. त्यानी टिळकाना दूषणास्पद ठरविण्याकरिता 'हिंदुस्थानातील अस्वस्थतेचे जनक' असे आपल्या पुस्तकात म्हटले आहे. पण राष्ट्राचा अभ्युदय व्हावयाचा तर ते नेहमी असंतुष्ट व अस्वस्थच असले पाहिजे, ' असंतोषः श्रियो मूलं' हे वचन चांगल्या अर्थाने घेतले असता व्यक्तिप्रमाणे राष्ट्रालाहि ते लागू पडते. जर्मन कवि गटे याच्या फाऊस्ट नामक नाटकात असे दाखविले आहे की सैतानाला वचनबद्ध झालेला नाट्य-नायक जोपर्यंत स्वतःवर आणि जगावर असंतुष्ट होता तोपर्यंत सैतानाला आपले पाश घालून त्याला स्वाधीन करून घेता आले नाही. पण तो आपल्या स्थितीवर संतुष्ट झाल्याचा उद्गार त्याच्या तोंडून निघताच सैतानाने त्याला आपल्या पाशात खेचून घेऊन पाताळात नेले ! हिंदुस्थान हे आपल्या विद्यमान परतंत्र स्थितीवर संतुष्ट होईल त्याच क्षणी त्याचा नाश होईल. म्हणून त्याने नेहमी असंतुष्टच राहिले पाहिजे, व तरच त्याचा भाग्योदय होण्याची आशा आहे हे टिळकानी ओळखून असंतोष व अस्वस्थता निर्माण केली. चिरोल साहेबानी टिळकाना 'हिंदुस्थानातील असंतोषाचे जनक' ठरविले त्यात त्यानी वस्तुस्थिति बरोबर वर्णन केली ! हिंदुस्थानाने शांत व संतुष्ट राहावे यात इंग्लडचे हित असल्यामुळे 'अस्वस्थतेचे जनकत्व' हे मानभावी चिरोल साहेबानी सहजच दूषण ठरविले. तथापि राजकारणात 'नाथाच्या घरची उलटी खूण' हीच की चिरोल साहेबानी जे दूषण म्हणून दिले तेच टिळकासारख्या राष्ट्रपुरुषाला भूषणातले भूषण ठरले! टिळकाना लोकमान्य ही पदवी आत्मस्फूर्तीने देऊन, त्यांची शैकडो स्मारके करून, आणि प्रतिवर्षी त्यांची मृत्युतिथि पाळून सर्व हिंदी राष्ट्राने हे भूषण मार्मिकपणाने आपल्या राष्ट्रीय निशाणावर मिरविले आहे. म्हणून 'हिंदुस्थानातील असंतोषाच्या जनकाला ' बाचकवर्गासमवेत एकवार अभिवादन करून हा चरित्रग्रंथ समाप्त करितो. समाप्त