पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र भाग ९ हे धर्म व संस्कृति यांच्या दृष्टीने इष्ट. तरी प्रौढपणी मनुष्याने किती कर्मठ असावे किंवा नसावे ही त्याच्या आवडीची गोष्ट होय. टिळक स्वतः जरी कर्मठ नसले तरी कर्मठपणाने वागणाऱ्या हिंदुबद्दल त्यांच्या मनात आदरबुद्धि असे. आणि कोणत्याहि कर्मठ मनुष्याची त्यानी कधींहि थट्टा केली नाही. पण लौकिक कर्माबर त्यांचा विशेष कटाक्ष असल्यामुळे प्रवृत्तीपर कर्मे संभाळून त्यांतल्यात्यांत जो धार्मिक कर्मठपणाहि संभाळील त्याच्याचविषयी त्यांना खरा आदर असे. उलट जे धर्म भावनेच्या भरात बहावले, लौकिक प्रवृत्तीपर कर्मे ज्यानी टाकून दिली आणि धार्मिक कर्मकांडातच जे गुरफटले गेले, त्यांच्याबद्दल मात्र टिळकाना आदर वाटत नसे. धार्मिक कर्मापासून प्रत्यक्ष मुक्ति मिळते ही गोष्ट त्याना मान्य नव्हती. धार्मिक कर्मे ही एक प्रकारची वरिष्ठ नैतिक भूमिकेला पोचण्याची पूर्वतयारी आहे असे ते म्हणत. पण त्याबरोबर असेहि म्हणत की अशा तयारीशिवाय कोणी त्या पदवीला पोचणारच नाही असे मात्र नाही. तात्पर्य त्यांची व्यावहारिक धर्मबुद्धि लोकसंग्रहाच्या दृष्टीने बनलेली होती. म्हणून ज्या धार्मिक आचाराने हिंदु म्हणविणारे अधिकात अधिक लोक एकत्र जमतील व अभिमानाने एकमेकाना हिंदु म्हणून ओळखतील तो धार्मिक कर्ममार्ग श्रेयस्कर असे त्याना वाटे. वैयक्तिकापेक्षा सामुदायिक धर्माचरणाची त्याना अधिक काळजी असे. कारण अशा सामुदायिक धर्माचरणानेच समाज निगडित होऊन रहातो. कर्मकांडाबद्दल मनातून खरा उद्वेग नाही, पण कोणत्याहि लौकिक कृत्याला आड न येण्यापुरता तो असावा इतकेच त्यांचे म्हणणे होते. धर्माचरणासंबंधाने मनाची ही अनुकूल भूमिका असल्यामुळे, टिळकानी किंचित् पुढे जाऊन यमनियमांचे बंधन याहून थोडे अधिक लावून घेतले असते तर त्यांची राजकारणी पुढाऱ्याप्रमाणे धार्मिक पुढाऱ्यातहि गणना झाली असती. ते सामुदायिक हिंदु धर्माला फार जपत आणि त्याचे कसून समर्थन करीत. यामुळे त्याना धर्माभिमानी ही पदवी मिळाली होतीहि. पण कर्मठ मनुष्ये त्यांच्या आचारासंबंधाने खाजगी रीतीने बोलताना सहजच नाके मुरडीत व त्याना प्रच्छन्न सुधारक असेहि म्हणत. ही निंदा थोडेसे ढोंग करून त्याना सहज टाळता आली असती. त्यानी इतर कार्यांची बंधने आपल्या मागे काही थोडथोडकी लावून घेतली नव्हती. आणि त्यातच याहि काही थोड्या बंधनांची भर टाकली असती तर हवीच होती. उदाहरणार्थ स्नानानंतर ते नियमाने संध्या करिते, किंवा गंधाला भस्माची बैठक घालते, किंवा गळ्यात रुद्राक्षाची किंवा पोवळ्याची माळ धारण करिते, किंवा स्नानानंतर ते काही वेळ ध्यानस्थ बसून कोणाची भेट न घेते, तर लोकानी त्यांची धर्मबुद्धि आणखी चौपट वाखाणली असती. आणि सुधारकांकडून मिथ्या पुराणमतवादी अशी टीका करून घेत असता सच्चे धर्माचरणी असे निदान पुराणमतवाद्यांकडून म्हणवून घेण्याचे श्रेय त्याना सहजासहजी लाभले असते ! पण ते मिळविण्याला लागणारी यमनियमांची झीज त्यानी सोसली नाही आणि अशा रीतीने दोन्ही बाजूकडून तोटे मात्र पदरी घेतले ! पण याचे कारण हेच