पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ९ माणसाने निरनिराळ्या वेळी कल्पना चालविली तरी ही कल्पनारूपे वेगवेगळी असू शकतील. पण भक्तिभावना हे जसे ईश्वराचे अस्तित्व मानण्याला सबळ कारण, तशीच भूते व राक्षस यांचे अस्तित्व मानण्याचे खरे कारण भीति हे असते. 'कीर्तिमान' टिळकांची हजारो लोकांची कल्पना त्यांच्या भौतिक स्वरूपाच्या कल्पनेइतकीच वस्तुस्थितीला सोडून असण्याचा संभव होता. ज्यानी टिळक कधी पाहिले नव्हते अशानी त्यांच्या स्वरूपाविषयी चालविलेल्या कल्पना ऐक- ण्याचा प्रसंग मला अनेक वेळा आला. त्यानी मुद्दाम होऊन टिळकांचे वर्णन केले नाही पण त्यांच्या बोलण्याच्या ओघावरून ते वर्णन न कळत बाहेर पडत असे. सामान्य लोकांची कल्पना अशी की टिळक हे कमीत कमी सहा सात फूट उंच, भले लट्ठ. कदाचित् गुलमिशावाले. हातात एखादे भले मोठे दांडके वाप- रणारे असे पुरुष असावे. पण हे वर्णन वस्तुस्थितीला अगदी सोडून होते. दुसऱ्या कित्येकांची कल्पना अशी की टिळकाना एखादा साहेब दिसला न दिसला पुरे, ते त्याच्या अंगावर खेकसत असतील, त्याला तोंडावर शिव्याशाप देत असतील, त्याचे आईबाप उद्धरीत असतील, किंवा हातातले सोडगेहि त्याच्या अंगावर उगारीत असतील ! ही कल्पना वरच्या इतकीच वस्तुस्थितीला सोडून होती हे सांगणे नकोच. टिळक हे कोणी मोठे विरागी म्हणजे साधूसंता- सारखा पोशाख केलेले, किंवा अंगाला भस्म फासलेले, किंवा कपाळाला लाल शेंदराचे बोट लावलेले, अशी जी कित्येकांची कल्पना तिचीहि गत वरीलप्रमाणेच. आणि टिळक हे देवासारखे होते ते नवसाला पावत किंवा मनातले ओळखीत किंवा भविष्य सांगत किंवा रोग बरे करीत अशाहि ज्या कल्पना- अर्थात् फार थोड्या लोकांचे ठिकाणी दिसून येत होत्या त्याहि खोट्या होत्या हे सांगावयास नको. टिळकांचे फोटो रंगीत चित्रे किंवा साधी छापील चित्रे ही सर्व हिंदु- स्थानभर इतकी पसरलेली आहेत की त्यांच्या स्वरूपाची सामान्यहि कल्पना नाही असा मनुष्य विरळा. महाराष्ट्रात तर काही विशिष्ट वर्गाचे लोक सोडले असता बहुधा असे एकहि मध्यम वर्गातील घर सापडणार नाही की ज्यात टिळकांचे चित्र कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात नसेल. टिळकांच्या आयुष्यात अनेक प्रसंग असे आले की सर्व देशाच्या तोंडी त्या वेळी त्यांचे नाव झाले. आणि या प्रत्येक प्रसंगाचा फायदा घेऊन छापखानेवाल्यानी त्यांची चित्रे हजारोनी काढून विकली. त्यांच्या मरणानंतरहि कोणी कॅलेंडरावर कोणी आल्बममध्ये कोणी वर्तमानपत्रावर कोणी पत्रव्यवहाराचे कागद किंवा लिफाफे याजवर कोणी पंचांगावर कोणी रोज- निशीवर अशा रीतीने त्यांचे चित्र अजूनहि छापतात. कोणी ही गोष्ट स्वार्थदृष्टीने कोणी व्यक्तिशः त्यांच्या अभिमानाने कोणी पक्षाच्या अभिमानाने तर कोणी राष्ट्रीय भावनेची खूण म्हणून करितात. कसेहि असले तरी प्रतिमादर्शनाचा मान या देशात टिळकाना जितका लोकानी दिला तितका इतर कोणाहि व्यक्तीला दिला असेल असे वाटत नाही.